Bal Sahitya Sammelan Bidkin : बालसाहित्यकारांनी ‘अपडेट’ होण्याची गरज – दासू वैद्य | पुढारी

Bal Sahitya Sammelan Bidkin : बालसाहित्यकारांनी 'अपडेट' होण्याची गरज - दासू वैद्य

बिडकीन, पुढारी वृत्तसेवा :  काळ बदलतो तसा पिढीही बदलते, बालसाहित्य लिहिणाऱ्यांना नव्या पिढीच्या संकल्पना समजून घेण्यासाठी अपडेट व्हावे लागेल, बालसाहित्य लिहिणे हे सोपे काम नसून ते गांभीर्याने होण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक,कवी दासू वैद्य यांनी केले. Bal Sahitya Sammelan Bidkin

अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे,  शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने बिडकीन (ता.पैठण) येथे सृजन शैक्षणिक प्रतिष्ठानच्या विद्यालयात शनिवार ( ता.२०) रोजी “मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती अंबादासराव जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. माजी संमेलनाध्यक्ष साहित्यिक बाबा भांड, सूर्यकांत सराफ, मुख्य संस्था कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, अशोक सातपुते, स्वागताध्यक्ष भास्करराव आर्वीकर, छत्रपती संभाजीनगर शाखेचे कार्यवाह डॉ.विनोद सिनकर, उपाध्यक्ष प्रशांत गौतम, विश्वनाथ ससे, गेणू शिंदे, नरसिंह कुलकर्णी, रविंद्र ठाणगे, धोंडीरामसिंह राजपूत आदी उपस्थित होते. Bal Sahitya Sammelan Bidkin

प्रथम सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करून दिनेश संन्यासी आणि त्यांच्या विद्यार्थी संचाने ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या अभंग गायनाबरोबरच स्वागत गीतही सादर केले. ‘मराठवाड्यातील बालसाहित्यिकांचे पुस्तक दालन’ व  ‘चित्रकला प्रदर्शन’ यांचे उद्घाटन झाले. विश्वनाथ ससे यांच्या ‘गावशिवारातील बालपण’ या बालकथासंग्रहाचे प्रकाशन  न्यायमूर्ती अंबादास जोशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्वागताध्यक्ष भास्करराव आर्वीकर यांनी ग्रामीण भागात भागात बालकुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत बिडकीन मधील साहित्यिक वातावरणाबद्दल माहिती दिली. आणि उपस्थिताचे स्वागत केले.

संमेलनाध्यक्ष दासू वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालसाहित्यिकांकडून दर्जेदार व पर्यावरण पूरक, लिखाणाची अपेक्षा केली. बाबा भांड,सूर्यकांत सराफ, यांनीही बालसाहित्यिकांनी मुलांच्या भाव विश्वाचा विचार करून लेखन व्हावे अशी अपेक्षा केली. संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबा भांड,सूर्यकांत सराफ यांचे स्वागत आणि सत्कार शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत गौतम यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचलन डॉ.विनोद सिनकर यांनी केले तर आभार संदीप भदाणे यांनी मानले.

‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ ज्येष्ठ बालसाहित्यिक

धोंडीरामसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, यात मराठवाड्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यात सुरेश हिवाळे (सेलू), ज्योती सोनवणे(छत्रपती संभाजीनगर), दिगंबर दाते (जालना), अशोक पाठक (परभणी), अयुब पठाण लोहगावकर (बिडकीन), तात्याराव पवार (वैजापूर), प्रदीप देशमुख (जालना), तसेच कु.शर्वरी जोशी (छत्रपती संभाजीनगर), यशोदा खेत्रे (हर्सूल), शर्वील देशमुख(छत्रपती संभाजी नगर) या बालकांनीही स्वरचित कविताचे उत्तम सादरीकरण केले.

धोंडीरामसिंह राजपूत यांनी पाण्याच्या थेंबाचे महत्व विशद करीत कविता सादर करून कवींनी मुलांच्या भाव विश्वाला प्राधान्य देऊन पुढील कविता कराव्यात, असे आवाहन केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचलन संदीप भदाणे यांनी केले. तर आभार संगीता मंडलिक यांनी मानले.

मराठवाड्यातील बाल साहित्यिकांचे पुस्तक दालनासाठी उपस्थित बालसाहित्यिकांनी आपल्या बालसाहित्याच्या पुस्तकांच्या प्रत्येकी दोन प्रती भेट म्हणून दिल्या. तर ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबा भांड यांनी स्वतःची मोठी ग्रंथसंपदा या दालनासाठी भेट म्हणून दिली.
समारोप समारंभात संमेलनासाठी विशेष परिश्रम घेणारे सृजन विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र ठाणगे आणि विनोद सिनकर यांचा अध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नांदेड येथील माजी आमदार गंगाधर पटणे, सामाजिक कार्यकर्ते किसनलाल तोतला सबचे मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले आदींसह बिडकीन परिसरातील ग्रामस्थ पालक विद्यार्थी बहुसंख्येने या संमेलनास उपस्थित होते.

 कथाकथनात उमटले शैक्षणिक प्रतिबिंब

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य व ख्यातनाम कथाकार कथाकार धनंजय  गुडसूरकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांच्या कथाकथनात प्रा.नामदेव निकम(गारज), आराध्य नागरगोजे(बीड) , डॉ.विठ्ठल जाधव(शिरूर कासार), वैशाली साब्दे(संभाजीनगर), अथर्व जाधव (संभाजीनगर) यांनी कथा सादर केल्या. या कथाकथनात आराध्य नागरगोजे या बालकाने लक्षवेधी कथा सादर केली . संचलन विश्वनाथ ससे यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील कथा प्रभावीपणे सादर करीत कथाकारांनी उपस्थितांची दाद मिळविली .

 समारोप समारंभाचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी वाचनसंस्कृती, ग्रामीण भागात संमेलनांचे महत्त्व अधोरेखित करत श्रोत्यांशी उत्तम संवाद साधला. साहित्यिक वातावरण जोपासणाऱ्या सृजन विद्यालयास बालकांसाठी शंभर पुस्तके भेट देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा 

Back to top button