LSG vs PBKS : लखनौचा नवाबी थाटात विजय; पंजाब किंग्ज 21 धावांनी पराभूत

LSG vs PBKS : लखनौचा नवाबी थाटात विजय;  पंजाब किंग्ज 21 धावांनी पराभूत
Published on
Updated on
लखनौ; वृत्तसंस्था : लखनौ सुपरजायंटस्ने पंजाब किंग्जला 21 धावांनी हरवून यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. लखनौने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 199 धावा करून पंजाबला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. पण पंजाबचा डाव 178 धावांवर थांबला. पहिलाच सामना खेळणार्‍या वेगवान गोलंदाज मयंक यादवने 27 धावांत 3 विकेट घेत पदार्पण गाजवले. (LSG vs PBKS)

विजयासाठी 200 धावांचा पाठलाग करताना कर्णधार शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पंजाब किंग्जसाठी शतकी सलामी दिली. बेअरस्टो 42 धावांवर बाद झाला तर धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर प्रभसिमरनने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला 14 व्या षटकात 130 धावांपर्यंत पोहोचवले.

दमदार सुरुवातीनंतर पंजाब किंग्जच्या मधल्या फळीला मयंक यादव अन् मोहसीन खान यांनी धक्क्यावर धक्के दिले. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या मयंक यादवने आपल्या वेगाने लखनौच्या भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्याने 4 षटकात 27 धावा देत 3 विकेटस् घेतल्या. त्यानंतर मोहसीन खानने 33 धावात 2 विकेटस् घेत पंजाबची अवस्था 17 व्या षटकात 5 बाद 141 धावा अशी केली. यात धवनचाही समावेश होता. धवन 50 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. लिव्हिंगस्टोनने शेवटच्या षटकांत हाणामारी केली. त्याने 17 चेंडूत 28 धावा केल्या. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबचा डाव 5 बाद 178 धावांवर थांबला. त्यांना विजयासाठी 21 धावा कमी पडल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून यजमान लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. नियमित कर्णधार लोकेश राहुल 'इम्पॅक्ट' प्लेअरच्या रूपात दिसला. क्विंटन डीकॉक आणि लोकेश राहुल या जोडीने संथ खेळी करत डावाची सुरुवात केली. राहुलला (15) बाद करून अर्शदीप सिंगने लखनौला पहिला झटका दिला. त्यानंतर डीकॉकने मोर्चा सांभाळत अर्धशतकी खेळी केली. डीकॉकने 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 38 चेंडूंत सर्वाधिक 54 धावा केल्या. प्रभारी कर्णधार निकोलस पूरन (42) आणि कृणाल पंड्या (नाबाद 43) यांच्या खेळीच्या जोरावर यजमानांनी मजबूत धावसंख्या उभारली. (LSG vs PBKS)

देवदत्त पडिक्कल (9), मार्कस स्टॉयनिस (19), आयुष बदोनी (8), रवी बिश्नोई (0), मोहसिन खान (2) हे फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पंजाब किंग्जकडून सॅम करनने सर्वाधिक (3) बळी घेतले, तर अर्शदीप सिंग (2), कगिसो रबाडा आणि राहुल चहर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news