वाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावर कारमध्ये ३६ लाखांची रक्कम; स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई | पुढारी

वाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावर कारमध्ये ३६ लाखांची रक्कम; स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

वाशीम; अजय ढवळे : कारंजा ते अमरावती रस्त्यावर धनज येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. आचारसंहितेदरम्यान  अवैधरित्या ३६ लाखांची रक्कम नेणाऱ्या कारवर कारवाई करण्यात आली आहे.

 याबाबत अधिक माहितीनुसार, आज (दि. ३० मार्च) दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमरावतीकडून येणाऱ्या कारची (एमएच २७ बीएक्स १०५६) स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी केली. वाहनामध्ये ३६ लाख १३ हजार अशी रक्कम आढळून आली. या वाहनाचे वाहन चालक नरेंद्र ढोले आणि वाहनातील व्यक्तींना इतर व्यक्तींना रकमेविषयी विचारले असता ही रक्कम एटीएम व बँकेमध्ये भरणेसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र पथकाने अधिक चौकशी केली असता नियम धाब्यावर बसवत रक्कम वाहतूक होत असल्याचा संशय आला. या घटनेची माहिती स्थिर सर्वेक्षण पथकाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांना फोन द्वारे कळविली असता ही संशयास्पद रक्कम जप्त करण्याविषयी त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास करण्यात कामी आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे आचारसंहिता कालावधीत दहा लाखापेक्षा जास्त रक्कम अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळल्यास याबाबतचा पुढील तपास आयकर विभाग करण्यात येते. या प्रकरणाची कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, सहाय्यक खर्च निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली धनज येथील स्थिर सर्वेक्षण पथकातील स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य पुरुषोत्तम भगवान ठाकरे, ब्रह्मानंद निळकंठराव राऊत, गजेंद्र बापूराव पाखरे, अजय नारायण ढोके, सुनील मेहरे यांनी केली आहे.

Back to top button