Sri vs Ban : बांगला देशचा श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय | पुढारी

Sri vs Ban : बांगला देशचा श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय

चत्तोग्राम; वृत्तसंस्था : यजमान बांगला देशने येथील तिसर्‍या वन डे लढतीत श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 फरकाने विजय संपादन केला. तिसर्‍या व शेवटच्या लढतीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 235 धावा केल्या तर प्रत्युत्तरात बांगला देशने 40.2 षटकांतच 6 बाद 237 धावांसह दमदार विजय संपादन केला. रिषद होसेन सामनावीर तर नजमूल शांतो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. (Sri vs Ban)

विजयासाठी 236 धावांचे आव्हान असताना सलामीवीर तंझिद हसनने 81 चेंडूंत 9 चौकार, 4 षटकारांसह 84 धावांचे योगदान देत विजयाची भक्कम पायाभरणी केली आणि यानंतर बांगला देशला फारसे मागे वळून पाहावे लागले नाही. मधल्या व तळाच्या क्रमवारीतील रिषद होसेनने अवघ्या 18 चेंडूंतच नाबाद 48 धावांची दमदार आतषबाजी केली तर यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकूर रहीम 36 चेंडूंत 37 धावांवर नाबाद राहिला. या जोडीने 40.2 षटकांतच विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर लंकेतर्फे जनिथ लियानगेने नाबाद शतक झळकावले. त्याने 102 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह 101 धावांचे योगदान दिले. तो याच धावसंख्येवर नाबादही राहिला. अन्य फलंदाज मात्र ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने लंकेला मोठी धावसंख्या रचण्यापासून बरेच दूर राहावे लागले. बांगला देशतर्फे तस्कीन अहमदने 42 धावांत 3 तर मुस्तफिजूर रहमान व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

हेही वाचा :

Back to top button