IPL 2024 : काही संघांची भिस्त युवा खेळाडूंवर, तर काहींची भिस्त अनुभवींवर! | पुढारी

IPL 2024 : काही संघांची भिस्त युवा खेळाडूंवर, तर काहींची भिस्त अनुभवींवर!

आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणार्‍या लीगमध्ये काही संघांनी युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे, तर काही संघांनी अनुभवी आणि वयस्कर खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. आयपीएलमधील या तरुण व अनुभवी खेळाडूंवर एक नजर… (IPL 2024)

अंगकृष्ण रघुवंशी; (वय : 18 वर्षे 287 दिवस)

आयपीएल 2024 मधील सर्वात तरुण खेळाडू म्हणजे अंगकृष्ण रघुवंशी. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 20 लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. या खेळाडूने आतापर्यंत 7 टी-20 सामने खेळले असून 115.96 च्या स्ट्राईक रेटने 138 धावा केल्या आहेत. 2022 अंडर-19 विश्वचषकात अंगकृष्णने 6 सामने खेळले आणि 46.33 च्या सरासरीने 278 धावा केल्या. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

अरावेल्ली अवनीश; (वय : 18 वर्षे 290 दिवस)

आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात अरावेली अवनीशला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ने 20 लाख रुपयांना विकत घेतले. तो मूळचा हैदराबादचा असून यष्टिरक्षक फलंदाज आहे. या खेळाडूने अद्याप एकही टी-20 सामना खेळलेला नाही. अवनीश अंडर-19 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 सामने खेळला आहे. ज्यातील 12 डावांमध्ये 21.87 च्या सरासरीने 175 धावा करण्यात यशस्वी झाला आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 60 धावा आहे. (IPL 2024)

स्वस्तिक चिकारा; (वय 18 वर्षे 350 दिवस)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणार्‍या स्वस्तिक चिकाराला दिल्ली कॅपिटल्सने (डीसी) 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. आतापर्यंत त्याने एकही टी-20 क्रिकेट सामना खेळलेला नाही. या खेळाडूला लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 6 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. या दरम्यान त्याने 33.33 च्या सरासरीने 200 धावा काढल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 1 शतक झळकले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 धावा आहे.

अर्शीन कुलकर्णी; (वय 19 वर्षे 32 दिवस)

अर्शीन कुलकर्णी लखनौ सुपर जायंटस् (एलएसजी) संघाचा भाग असेल. आयपीएल 2024 साठी दुबई येथे झालेल्या लिलावात त्याला फ—ँचायझीने 20 लाख रुपयांना करारबद्ध केले. या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त 6 सामने खेळले असून 5 डावांत त्याने 163.51 च्या स्ट्राईक रेटने 121 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीतही अर्शीन कौशल्य दाखवून 6 सामन्यांत 4 बळी घेतले आहेत.

नूर अहमद; (19 वर्षे 75 दिवस)

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमद आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून (जीटी) खेळत आहे. त्याने 2023 मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 23.06 च्या सरासरीने 16 विकेटस् घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.82 आहे. 37 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये 83 सामने खेळले असून 25.06 च्या सरासरीने 88 बळी घेतले आहेत. (IPL 2024)

महेंद्रसिंग धोनी; (वय : 42 वर्ष 255 दिवस)

चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 मधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तो 2008 पासून आयपीएल खेळत आहे. भारतीय क्रिकेट संघातून निवृत्ती घेतल्यानंतरही तो आयपीएल खेळत राहिला. त्याने आतापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 च्या सरासरीने 4,082 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 135.92 आहे. त्याचा हा शेवटचा हंगाम असेल, असे मानले जात आहे.

फाफ डू प्लेसिस; (वय : 39 वर्षे 249 दिवस)

फाफ डू प्लेसिस आयपीएलमधील सर्वात जुना खेळाडू आहे. तो सध्या आरसीबीचा कर्णधार आहे. पुढील वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. अशा स्थितीत डू प्लेसिसचा हा शेवटचा हंगाम असेल, असा अंदाज आहे. डू प्लेसिसने 130 आयपीएल सामन्यांत 36.90 च्या सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राईक रेटने 4,133 धावा केल्या आहेत. या कालावधीत या खेळाडूने 33 अर्धशतके झळकावली आहेत.

वृद्धिमान साहा; (वय : 39 वर्षे 146 दिवस)

गुजरात टायटन्सच्या (जीटी) वृद्धिमान साहाने आयपीएलमध्ये 161 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 128.05 च्या स्ट्राईक रेटने 2,798 धावा काढल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 1 शतक आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत.

मोहम्मद नबी; वय : 39 वर्षे 77 दिवस)

मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने 2017 मध्ये त्याचे आयपीएल पदार्पण केले. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत. फलंदाजी करताना त्याने 15.00 च्या सरासरीने 180 धावा तर गोलंदाजी करताना 13 विकेटस् घेतल्या आहेत. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी तो एसआरएच, केकेआर संघांकडून खेळला आहे.

दिनेश कार्तिक; (वय : 38 वर्षे 291 दिवस)

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. त्याने याबाबत यापूर्वीच खुलासा केला आहे. कार्तिकने आतापर्यंत 242 सामने खेळले असून सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत तो तिसर्‍या क्रमांकावर आहे. या बाबतीत धोनी (250) आणि रोहित शर्मा (243) पहिल्या 2 स्थानावर आहेत. कार्तिकने आयपीएलमध्ये 25.8 च्या सरासरीने आणि 132.71 च्या स्ट्राईक रेटने 4,516 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. (IPL 2024)

हेही वाचा :

Back to top button