चकाचक रस्त्यावर लागतोय कचऱ्याचा ढीग; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

चकाचक रस्त्यावर लागतोय कचऱ्याचा ढीग; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नरेंद्र साठे

पुणे : महानगरपालिकेकडून ओला-सुका कचरा सोसायट्यांमधून गोळा केला जातो. मात्र, ज्या सोसायट्यांसाठी हे गैरसोयीचे आहे, त्यांच्याकडून रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जातो. धायरीमध्ये अनेक ठिकाणी नागरिक रात्रीच रस्त्यावर कचरा आणूण टाकतात. कचर्‍याचा एवढा मोठा ढीग साठतो की वाहनांना त्याला वळसा घालून पुढे जावे लागते. सकाळी सातच्या सुमारास सफाई कर्मचार्‍यांकडून हा परिसर स्वच्छ केला जातो. त्यानंतर इथे कचरा टाकू नका, अशा सूचना लिहून ठेवल्या जातात. तरीदेखील दुसर्‍या दिवशी इथे कचर्‍याचा ढीग पाहायला मिळतो.

धायरीतील गणेशनगरमधील पोकळे प्राथमिक विद्यालय भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. सकाळी सात वाजता सफाई कर्मचार्‍यांकडून रस्ता स्वच्छ केला जातो. मात्र, दुर्गंधी कायम राहते. त्याचबरोबर डीएसके चौकातून नर्‍हे रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जातो. रस्त्यावरून दुचाकी, चारचाकीमधून जाणार्‍यांकडून रस्त्याच्या बाजूला कचरा फेकला जातो. अनेकदा हा कचरा रस्त्यावर देखील पडतो. परिणामी, त्यावरून वाहनांची ये-जा झाल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्याचबरोबर रायकरमळा आणि अंबाईदर्‍याकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग दिसून येतात.

अंबाईदरा रस्त्यावरील कचरा नियमित उचलला जात नाही. धायरीमधील कचरा टाकण्याची काही जुणी ठिकाणे होती, ती आता पूर्ण बंद झाल्याचे देखील निदर्शनास आले. त्यामध्ये विजयनगर भागात अंगणवाडीच्या शेजारीच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. अंगणवाडीच्या बाहेर असलेल्या कचर्‍यामुळे पालक बालकांना अंगणवाडीत पाठवत नव्हते. अंगणवाडीबाहेर नागरिकांनी कचरा आणून टाकू नये म्हणून महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. रात्री उशिरापर्यंत एक कर्मचारी अंगणवाडीसमोर असायचा. पावसात देखील हा कर्मचारी येथे बसलेला असायचा आणि नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकण्यापासून रोखायचा. आता या ठिकाणी कचरा टाकण्याचे कायमचे बंद झाले आहे.

रविवारी साठतात कचर्‍याचे ढीग

रस्त्याच्या बाजूला टाकलेला कचरा रविवारी उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारे ठिकठिकाणी दिसून येतात. कचर्‍यामुळे या भागातील रहिवाशांना रविवारी दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्यात अद्यापतरी कुठलाही बदल झालेला नाही.

धायरीमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात असला तरी नागरिकांकडून अजूनही रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांकडून स्वच्छता ठेवली जात असली, तरी रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे. सर्वच धायरीकरांनी याबाबत सजग होण्याची गरज असून, त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाने देखील योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

– डॉ. अनिकेत देशपांडे, नागरिक

हेही वाचा

Back to top button