R Ashwin MS Dhoni : ‘आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन’, अश्विनने IPL पूर्वी असे का म्हटले? | पुढारी

R Ashwin MS Dhoni : ‘आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन’, अश्विनने IPL पूर्वी असे का म्हटले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin MS Dhoni : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी राजस्थान रॉयल्सचा स्टार ऑफस्पिनर आर. अश्विनने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे. तो म्हणाला की, ‘माझे क्रिकेट करियर बहरण्यात धोनीचा वाटा मोठा आहे. त्याने माझ्यासाठी जे केले आहे, त्यासाठी मी आयुष्यभर त्याचा ऋणी राहीन.’

अश्विनने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कसोटीतील 500 बळी आणि त्यानंतर 100 सामन्यांचा टप्पा गाठला. या दुहेरी यशाबद्दल तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA) नुकताच त्याचा 1 कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन सत्कार केला. त्या कार्यक्रमात बोलताना अश्विनने धोनीबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.

धोनीला दिले श्रेय (R Ashwin on MS Dhoni)

अश्विन म्हणाला, 2008 च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूममध्ये एमएस धोनी, मॅथ्यू हेडन यांना भेटलो. खरेतर मी तेंव्हा मी काहीच नव्हतो. त्या संघात दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन होते. त्यामुळे मला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणे शक्यच नव्हते. पण 2011 च्या आयपीएल फायनलमध्ये धोनीने चक्क मला नवीन चेंडू सोपवला आणि पहिले षटक टाकण्यास सांगितले. समोर ख्रिस गेल होता. जो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. अशा परिस्थितीत धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला. मी त्या संधीचे सोने केले. माझ्या कर्णधाराला निराश केले नाही. गेलला आल्यापावली माघारी धाडून पुढे तीन विकेट्स मिळवल्या. त्या रात्र आणि तो अंतिम सामना मी कधीच विसरू शकणार नाही. याला कारण म्हणजे केवळ धोनी हेच आहे.’

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आयपीएल 2011 च्या फायनलनंतरच अश्विनच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. आउट ऑफ द बॉक्स रणनीती बनवण्यात पटाईत असलेल्या धोनीने 2011 च्या आयपीएल फायनलमध्ये नवा चेंडू अश्विनकडे सोपवला होता. त्या सामन्यात उदयोन्मुख अश्विनने चौथ्या चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या ख्रिस गेलला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पुढे त्या सामन्यात अश्विनने तीन विकेट घेऊन सीएसकेच्या आयपीएलच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्या फायनलनंतर पुढील एका दशकाहून अधिक काळच्या प्रवासात अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 100 कसोटी सामने खेळले आणि 500 हून अधिक बळींचा टप्पा गाठला. सध्या त्याच्या नावावर 516 कसोटी बळींची नोंद झाली आहे.

Back to top button