Pat Cummins : ‘सनरायजर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूची वर्णी | पुढारी

Pat Cummins : 'सनरायजर्स'च्या कर्णधारपदी 'या' विश्वविजेत्या खेळाडूची वर्णी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी व्यवस्थापन संघात बदल करत आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने अचानक रोहित शर्माला हटवून कर्णधार पदाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली. आता आणखी एका संघानेही कर्णधारपदात मोठा बदल केला आहे. 2016 साली आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या सनरायझर्स हैदराबादने संघाचे नेतृत्व करणाऱ्या एडन मार्करमला कर्णधारपदावरून हटवून विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सकडे संघाची कमान सोपवली आहे. मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सने सलग दोन वर्षे दक्षिण आफ्रिका टी-२० लीग जिंकली आहे. (Pat Cummins)

मार्करमच्‍या नेतृत्त्‍वाखाली संघाची सुमार कामगिरी

एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या शेवटच्या मोसमात सनरायझर्सची कामगिरी सुमार झाली. संघाने 14 पैकी केवळ चार सामन्यांमध्‍ये विजय झाला. गुणतालिकेत हैदराबाद संघ दहाव्या स्थानावर फेकला गेला. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या मिनी ऑक्सनमध्ये सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकवून देणाऱ्या पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयांच्या विक्रमी किंमतीत विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावात त्याचा देशबांधव मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

कमिन्स विश्वविजेत्‍या संघाचा कर्णधार

गेल्या वर्षी कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. याशिवाय त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा कर्णधार नाही. ऑस्ट्रेलियन संघ यंदाचा टी-२० विश्वचषक नवा कर्णधार मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळेल अशी शक्यता आहे. (Pat Cummins) इतकेच नाही तर सनरायझर्सने मार्करामकडे दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगमधील त्यांच्या संघ इस्टर्न केपची कमान दिली आहे. सनरायझर्स इस्टर्न केपने गेल्या दोन मोसमात चमकदार कामगिरी करत जेतेपद पटकावले होते. या मोसमाच्या अंतिम फेरीत त्यांनी डर्बन सुपर जायंट्सचा ८९ धावांनी पराभव केला. लीग टप्प्यातही संघाने 10 पैकी सात सामने जिंकले आणि 33 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.

कमिन्स गेल्या तीन मोसमातील ‘सनरायझर्स’चा तिसरा कर्णधार

कमिन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयपीएल 2023 मधून माघार घेतली होती. त्याआधी तो 2020 ते 2022 पर्यंत कोलकाता संघाचा भाग होता. कमिन्स हा गेल्या तीन मोसमातील सनरायझर्स हैदराबादचा तिसरा कर्णधार आहे. 2022 मध्ये, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, संघ आठव्या स्थानावर होता. गेल्या मोसमात मार्करामने कमांड घेतली आणि आता कमिन्स हे करताना दिसणार आहे. 2023 च्या आयपीएलमध्ये, मार्कराम देखील फ्लॉप ठरला होता आणि 14 सामन्यांमध्ये 129 च्या स्ट्राइक रेटने 248 धावा करू शकला. (Pat Cummins)

मुख्य प्रशिक्षकही बदलला

याशिवाय सनरायझर्स हैदराबादने आणखी एक मोठा बदल केला आहे. फ्रेंचायझीने मुख्य प्रशिक्षकही बदलला आहे. न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ब्रायन लारा यांना हटवले आहे. 2023 मध्ये लारा टॉम मूडीच्या जागी सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रशिक्षक झाला. सनरायझर्स आयपीएल 2024 ची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डन्सवर करेल. हा सामना 23 मार्च रोजी होणार आहे. यानंतर संघ 27 मार्च रोजी हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना खेळणार आहे.

हेही वाचा :

Back to top button