Nashik News | शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ | पुढारी

Nashik News | शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेवाभगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. त्यांची शिकवण आणि प्रेरक विचार प्रत्येकाने आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला येथील मुक्तिभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्र व विविध विकासकामांचे लोकार्पण भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्राख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल व मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, समाजकल्याण सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

भाषणात भुजबळ म्हणाले, दि. १३ ऑक्टोबर १९३५ ला डॉ. आंबेडकर यांनी येवल्यात याच ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकालातील तीन भूमी महत्त्वाच्या आहेत. धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तिभूमी, जेथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ती नागपूरची दीक्षाभूमी व जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ती चैत्यभूमी या तीन भूमी आहेत.

मंत्री भुजबळ म्हणाले, मुक्तिभूमीवर यापूर्वी पहिल्या टप्प्यात सुमारे १५ कोटी रुपये निधीतून भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल इ. निर्माण करण्यात आले. या स्थळाला शासनाच्या वतीने ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी या वास्तूंचे संवर्धन करावे. येथे येणाऱ्या बौद्ध भिक्खूकडून विपश्यना संदर्भात ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन केले.

हेही वाचा :

Back to top button