BCCI Annual Contract List : बीसीसीआयचा श्रेयस अय्यर-इशान किशनला दणका! वार्षिक करारातून केली हकालपट्टी

BCCI Annual Contract List : बीसीसीआयचा श्रेयस अय्यर-इशान किशनला दणका! वार्षिक करारातून केली हकालपट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Annual Contract List : बीसीसीआयने मोठी कारवाई करत इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकले आहे. सतत इशारे देऊनही इशान आणि श्रेयस यांनी रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्याकडे दुर्लक्ष केले. आता हे दोन्ही खेळाडूंची नावे बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

बीसीसीआयने नुकतीच केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंची नवी यादी जाहीर केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय रवींद्र जडेजालाही A+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मानधन दिले जाते. 6 खेळाडूंना ए ग्रेडमध्ये, 5 खेळाडूंना बी ग्रेडमध्ये, तर 15 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. (BCCI Annual Contract List)

ए श्रेणी

आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

बी श्रेणी

सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

सी श्रेणी

रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

अय्यर-किशनवर बीसीसीआय संतप्त

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या आडमुठेपणामुळे बीसीसीआय संतापले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर इशान किशनला सातत्याने रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पण किशनने बीसीसीआयच्या या सुचनेकडे दुर्लक्ष केले आणि झारखंडच्या एकाही रणजी सामन्यात भाग घेतला नाही.

दुसरीकडे, श्रेयस अय्यर वेगळ्याच वादात अडकला. खराब कामगिरीमुळे अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. त्यातच त्याने रणजी ट्रॉफी न खेळण्यासाठी दुखापतीचे कारण पुढे केले. पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अय्यरचा खोटारडेपणा उघड केला. एनसीएने स्पष्ट केले होते की अय्यर फिट आहे आणि त्याला खेळण्यात कोणतीही अडचण नाही. (BCCI Annual Contract List)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news