INDvsENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताच्या दोन खेळाडूंना विश्रांती? अहवालात मोठा खुलासा

INDvsENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताच्या दोन खेळाडूंना विश्रांती? अहवालात मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीतून टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून विश्रांती देण्यात येणार असलाचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार यात एका गोलंदाजाचा आणि एका फलंदाजाचा समावेश असेल. दरम्यान, जसप्रीत बुमराह धर्मशाला कसोटीत खेळताना दिसेल, असा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बुमराहला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती.

चौथा कसोटी सामना रांची येथे खेळला गेला, जो भारताने पाच विकेट्सने जिंकला. त्या सामन्यात बुमराहच्या जागी आकाशदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. त्याने पदार्पणाच्या कसोटीत खूप प्रभावित केले. जर बुमराहचे पुनरागमन झाले तर आकाशदीपला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल.

धर्मशाला येथे 7 मार्चपासून हा सामना सुरू होणार आहे. रांची कसोटीत पाहुण्या इंग्लिश संघावर विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करत आहे. तथापि, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी विश्रांती देण्यात येणा-या क्रिकेटपटूंची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. (INDvsENG 5th Test)

दरम्यान, केएल राहुल दुखापतीमुळे धर्मशाला येथील सामन्यालाही मुकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी तो दुस-या, तिस-या, चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत राहुलला क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. त्यानंतर सलग तीन कसोटी सामन्यातून त्याने माघार घेतली. या दुखापतीतून तो अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयनेही त्याला उपचारासाठी लंडनला पाठवले आहे. तो भारतात कधी परत येईल हे निश्चित नाही. यावरून तो धर्मशाला कसोटीत खेळताना दिसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. (INDvsENG 5th Test)

राजकोट येथील तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी राहुलला 90 टक्के मंजुरी देण्यात आली होती. परंतु संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) ने परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आधीच 3-1 ने आघाडीवर असल्याने, निवडकर्ते टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याला सावरण्यासाठी आणखी वेळ देऊ शकतात.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील युवा भारताच्या युवा संघाने या मालिकेत आपल्या चमकदार खेळीने प्रभावित केले आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, आकाशदीप आणि ध्रुव जुरेल या युवा क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी केली आहे, तथापि, रजत पाटीदारने बरीच निराशा केली आहे आणि त्याला पाचव्या कसोटीतून बाहेर बसावे लागेल, अशी चर्चा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news