IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीत भारत 238 धावांनी पुढे, इंग्लंडच्या दुसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 207 धावा, डकेटचे झंझावाती शतक | पुढारी

IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीत भारत 238 धावांनी पुढे, इंग्लंडच्या दुसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 207 धावा, डकेटचे झंझावाती शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताच्या पहिल्या डावातील 445 धावांचा पाठलग करताना इंग्लंडने 2 बाद 207 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लिश संघ अजूनही 238 धावांनी मागे आहे. बेन डकेट 133 आणि जो रूटने 9 धावा करून नाबाद परतले आहेत. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि सिराजने 1-1 विकेट घेतली.

पोप बाद

मोहम्मद सिराजने ओली पोपला पायचित करून इंग्लिश संघाला दुसरा धक्का दिला. 30व्या षटकातील शेवटचा चेंडू सिराजने गुड लेंथवर इन-स्विंगर टाकला. चेंडू पोपच्या पॅडवर आदळला. भारताने LBW साठी अपील केले पण अंपायरने नॉट आऊट दिला. सिराजच्या सांगण्यावरून कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टंपला लागल्याचे दिसून आले. अंपायरने आपला निर्णय बदलला आणि पोपला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याने 55 चेंडूत 39 धावा केल्या.

डकेटचे झंझावाती शतक

बेन डकेटने 88 चेंडूत शतक झळकावले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक ठरले. इंग्लिश फलंदाजाचे हे भारतातील कसोटीतील सर्वात जलद शतक आहे. त्याचबरोबर विदेशी फलंदाजाचे हे तिसरे जलद शतक आहे. ॲडम गिलख्रिस्टने 2001 मध्ये भारतात 84 चेंडूत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉईडने 1974 मध्ये 85 चेंडूत शतक झळकावले होते.

भारताविरुद्ध सर्वात वेगवान कसोटी शतक (चेंडूंनी)

84 चेंडू : ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मुंबई 2001
85 चेंडू : क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज), बंगळूर 1974
88 चेंडू : बेन डकेट (इंग्लंड), राजकोट 2024*
99 चेंडू : रॉस टेलर (न्यूझीलंड), बंगळूर 2012

इंग्लंडला पहिला धक्का

इंग्लंडला पहिला धक्का 89 धावांवर बसला. रविचंद्रन अश्विनने जॅक क्रॉलीला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. अश्विनची कसोटीतील ही 500वी विकेट ठरली. हा आकडा गाठणारा तो नववा गोलंदाज आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. कुंबळेच्या नावावर कसोटीत 619 विकेट्स आहेत.

इंग्लंडचा पहिला डाव सुरू

इंग्लंडचा पहिला डाव सुरू तेव्हा एकही चेंडू न खेळता त्यांच्या खात्यात पाच धावा जमा झाल्या होत्या. वास्तविक, अश्विन त्याच्या डावात खेळपट्टीच्या मध्यभागी धावताना दिसला. त्यामुळे भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला. ज्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी इंग्लंडला पाच धावा बहाल केल्या. ही घटना भारतीय डावाच्या 102 व्या षटकात घडली. दोन इशाऱ्यांनंतर एखाद्या संघाचा खेळाडू खेळपट्टीच्या संरक्षित क्षेत्रात तिसऱ्यांदा धावताना आढळल्यास, विरोधी संघाला पाच धावा दिल्या जातात. याच कारणामुळे इंग्लंडच्या डावाची सुरुवात पाच धावांनी झाली. बुमराहने पहिल्याच चेंडूवर नो बॉल टाकला. अशा स्थितीत बिनबाद एकाही चेंडूशिवाय इंग्लंडच्या धावफलकावर सहा धावा झळकल्या.

भारताचा डाव

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला. भारताने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 445 धावा केल्या. आज भारताने पाच बाद 326 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. आजच्या खेळात भारताने 119 धावांत उर्वरित पाच विकेट गमावल्या. (IND vs ENG 3rd Test)

पहिल्या अर्ध्या तासात टीम इंडियाने कुलदीप यादव (4) आणि रवींद्र जडेजा (112) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर रविचंद्रन अश्विनने ध्रुव जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रेहान अहमदने फोडली. त्याने आधी अश्विन (37) आणि नंतर ध्रुव जुरेल (46) पाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जसप्रीत बुमराहने सिराजसोबत 10 व्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. वुडने बुमराहला बाद करत भारताचा डाव 445 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रेहानला दोन विकेट्स मिळाल्या. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.(IND vs ENG 3rd Test)

भारताचा डाव 445 धावांवर ओटोपला

भारताच्या डावाची शेवटची विकेट जसप्रीत बुमराहच्या रूपाने पडली. त्याला इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडने बाद केले. बुमराहने आपल्या खेळीत 26 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावले. यासह त्याने 10 व्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत 30 धावांची भागिदारी केली.

भारताला दोन धक्के; अश्विन पाठोपाठ ध्रुव जुरेल बाद

सामन्यातीस 124 व्या षटकात ध्रुव जुरेलच्या रूपात भारताचा आठवा फलंदाज बाद झाला. त्याला इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमदने फोक्सकरवी झेलबाद केले. जुरेलने आपल्या खेळीत 104 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली.

भारताला आठवा धक्का; अश्विन बाद

भारताला 408 धावांवर आठवा धक्का बसला. रेहान अहमदच्या चेंडूवर अश्विनने जेम्स अँडरसनकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 37 धावा केल्या. अश्विनने ध्रुव जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी १७५ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. सध्या ध्रुव जुरेल ३९ धावा करून क्रीजवर आहे. त्याला साथ देण्यासाठी जसप्रीत बुमराह मैदानावर उतरला आहे.

भारताची धावसंख्या ७ बाद ४०० धावा पार; भारत मजबूत स्थितीत

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ७ गडी गमावून ४०० धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या अश्विन ३७ धावा तर, ध्रुव जुरेल ३२ धावांवर खेळत आहेत. फलंदाजी करताना कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या जुरेलचे दोन झेल सुटले आहेत.

लंचपर्यंत भारत ७ बाद ३८८; अश्विन-ध्रुवची उत्कृष्ट फलंदाजी

दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून ३८८ धावा केल्या होत्या. सध्या रविचंद्रन अश्विन २५ धावांवर तर, ध्रुव जुरेल ३१ धावांवर खेळत आहे. आज भारताला दोन धक्के बसले. कुलदीप यादव चार धावा करून जेम्स अँडरसनचा बळी ठरला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने जो रूटला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. 225 चेंडूत 112 धावा करून तो बाद झाला.

हे दोन्ही धक्के आजच्या पहिल्या अर्ध्या तासात भारताला बसले. म्हणजेच यानंतर अश्विन-जुरेल यांनी सुमारे दीड तास फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. आतापर्यंत दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 133 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली आहे.

भारताची धावसंख्या 350 धावांच्या पार

सात गडी गमावून भारताने 350 हून अधिक धावा केल्या आहेत. अश्विन 11 धावा तर ध्रुव जुरेल 10 धावांवर खेळत आहे. आज भारताला दोन धक्के बसले. कुलदीप चार तर जडेजा ११२ धावा करून बाद झाला. (IND vs ENG 3rd Test)

भारताला सातवा धक्का

दुसऱ्या दिवशीच्या डावाच्या अर्ध्या तासात भारताला दोन धक्के बसले. अँडरसनने कुलदीप यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जो रूटने त्याच्याच चेंडूवर रवींद्र जडेजाचा झेल घेतला. जडेजाने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. सध्या रविचंद्रन अश्विन आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत.

कुलदीप यादव बाद

भारताला आज पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला. दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या षटकात अँडरसनने कुलदीपला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. कुलदीपने 24 चेंडूत 4 धावा केल्या. (IND vs ENG 3rd Test)

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारतीय संघ पाच विकेटवर 326 धावांनी पुढे खेळत आहे. इंग्लंडसाठी जो रूटने पहिले षटक टाकले. त्याच वेळी, जडेजा 110 धावा केल्यानंतर आणि कुलदीप तीन धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. (IND vs ENG 3rd Test)

हेही वाचा :

 

Back to top button