राजकोट; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असल्याने तिसरा सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारताला हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का बसला होता; पण त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत भारताने विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता राजकोट येथे होणारी तिसरी कसोटी खास आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या स्टेडियमचे नाव निरंजन शहा यांच्या नावाने बदलण्यात येणार आहे. स्टेडियमचे नाव बदलल्यानंतर होणारी ही पहिली कसोटी असून, यामुळे ही मॅच इतिहासात नोंदली जाईल. (IND vs END 3rd Test)
यजमान संघाने आपल्या प्रथेप्रमाणे एक दिवस आधीच अंतिम संघ जाहीर केला, तर भारतीय संघ सामन्याच्या आधी जाहीर करण्यात येणार आहे. टीम इंडियातील बरेच अनुभवी खेळाडू खेळणार नसल्याने युवा खेळाडूंवर टीम इंडियाची राजकोटचा राजा होण्याची स्वप्ने बघत आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा शंभरावा सामना आहे, तर भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन पाचशे बळींचा टप्पा ओलांडण्यास सज्ज आहे. (IND vs END 3rd Test)
या सामन्यासाठी भारतीय संघ प्लेईंग-11 मध्ये काही मोठे बदल करू शकतो. यामध्ये दोन खेळाडूंच्या नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे. यष्टिरक्षक ध्रुव ज्युरेल आणि मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ मुंबईचा सर्फराज आणि उत्तर प्रदेशचा ध्रुव ज्युरेल या दोन्ही क्रिकेटपटूंच्या कसोटी पदार्पणाच्या आशा मंगळवारी बळकट झाल्या आहेत. या दोघांनी सराव सत्रात क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षणात हात आजमावला आणि त्यानंतर नेटमध्ये बराच वेळ फलंदाजीही केली.
विशाखापट्टणममध्ये शतक झळकावणार्या शुभमन गिलने बुधवारी सराव सत्रात भाग घेतला. दुसर्या कसोटीदरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. इंग्लंडच्या दुसर्या डावात तो क्षेत्ररक्षणही करू शकला नाही. मात्र, त्याची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. श्रेयस संघाबाहेर असल्याने आणि राहुल जखमी झाल्यामुळे रणजी ट्रॉफीमध्ये भरघोस धावा करणार्या सर्फराज खानसाठी कसोटीचे दरवाजे उघडले आहेत. तो गेल्या काही वर्षांपासून रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा फलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीमध्ये त्रिशतकही झळकावले आहे. ज्युरेलला भरतपेक्षा अधिक पसंती मिळू शकते. कारण, तो एक चांगला फलंदाज आहे. भरतला सलग सात कसोटी सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याचा पत्ता कट होऊ शकतो.
भारतीय संघ बदलाच्या काळातून जाण्यासाठी सज्ज आहे, अशा परिस्थितीत या सामन्यातून संघाच्या भविष्याची झलक पाहायला मिळेल. संघाच्या सराव सत्रादरम्यान पाटीदार आणि सर्फराज दोघेही स्लिप फिल्डिंगचा सराव करताना दिसले. खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड बराच वेळ गप्पा मारताना दिसले. त्यानंतर रोहित क्षेत्ररक्षणाच्या सरावासाठी गेला; पण द्रविड मैदानावरील खेळाडूंशी बोलताना दिसला. या मैदानावर गेल्या सामन्यात शतक झळकावणार्या जडेजाने आपला बहुतांश वेळ नेटमध्ये फलंदाजीचा सराव करण्यात घालवला. संघाचे चारही फिरकीपटू भारतीय फलंदाजांसोबत सराव करताना दिसले.
भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी उद्यापासून सौराष्ट्रक्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे; पण भारतीय संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. विराट कोहलीने या संपूर्ण मालिकेतून माघार घेतल्यानंतर के. एल. राहुलही तिसर्या कसोटीतून मागे हटला आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मा याचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे आणि सराव सत्रातही तो अडखळताना दिसला. (IND vs END 3rd Test)
रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत काही खास कामगिरी करता आलेली नाही. दोन कसोटीत 24, 39, 14 व 13 अशा धावा त्याने केल्या आहेत. विराट व के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीत रोहितच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. यशस्वी जैस्वालने मागील कसोटीत द्विशतक झळकावले, तर शुभमन गिलनेही शतकी खेळी केली. त्यामुळे आता रोहितला आपला फॉर्म दाखवावा लागणार आहे. कारण, गिल व यशस्वी वगळल्यास रजत पाटीदार, सर्फराज खान व ध्रुव ज्युरेल यांच्याकडे कसोटीचा अनुभव नाही.
मात्र, सराव सत्रात रोहित अडखळताना दिसला. नेट बॉलरने त्याला इनस्विंगवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर रोहितने थोडा आराम केला आणि पुन्हा सरावासाठी आला; पण त्याला अपेक्षित सूर गवसलेला दिसला नाही. उलट त्या गोलंदाजाने रोहितला पुन्हा बाद केले. रोहितने खेळपट्टीवर दोन्ही बाजूने फलंदाजी केली. परंतु, त्याचे बाद होण्याचे सत्र कायम राहिले. नेट सरावातील या अपयशावरून प्रत्यक्ष लढतीत त्याच्या कामगिरीवर चर्चा करणे चुकीचे असले, तरी त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय नक्कीच आहे.
इंग्लंडचा बेन स्टोक्स राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर अर्थात निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमवर त्याच्या करिअरची 100 वी कसोटी मॅच खेळण्यास उतरेल. टॉस होताच तो 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी खेळणार्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवेल.
100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी खेळणारे सर्वाधिक क्रिकेटपटू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांत आहेत. या दोन्ही देशांकडून प्रत्येकी 15 खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. आता भारताविरुद्ध तिसर्या कसोटीत मैदानावर उतरताच बेन स्टोक्स इंग्लंडचा 16 वा शतकवीर ठरेल. याचबरोबर 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी खेळणार्या खेळाडूंबाबत इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या पुढे जाईल.
राजकोट मैदानावर रोहित शर्मा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. द्रविडने 25 कसोटीत 8 विजय मिळवले होते. आता रोहितच्या नावावर कसोटीत 7 विजय झाले आहेत. इंग्लंडविरुद्ध तिसर्या कसोटीत विजय मिळवल्यास तो द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
भारताच्या दिग्गज फिरकीपटू अश्विनला कसोटीत 500 विकेट घेण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे. त्याने 97 सामन्यांत 499 विकेट घेतल्या आहेत. अश्विनला सर्वात वेगाने 500 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज होण्याची संधी आहे.
जेम्स अँडरसनच्या नावावर आतापर्यंत 695 विकेट आहेत. 700 विकेटसाठी त्याला फक्त 5 विकेटची गरज असून, अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर जगातील तिसरा गोलंदाज ठरेल. याआधी शेन वॉर्न (708), तर मुथय्या मुरलीधरनने (800) अशी कामगिरी केली आहे.
राजकोट येथे खेळल्या जाणार्या भारताविरुद्धच्या तिसर्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूडचा संघात समावेश केला आहे. स्पिनर शोएब बशीरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. आता इंग्लंडचे दोन घातक वेगवान गोलंदाज भारताविरुद्ध आक्रमण करतील. भारतविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात अडीच दिवस पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन केले. तिसर्या दिवशी भारताचा खेळ खल्लास केला आणि मालिकेत आघाडी घेतली; पण भारताने विशाखापट्टणम कसोटी जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. (IND vs END 3rd Test)
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव ज्युरेल (यष्टिरक्षक), के. एस. भरत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
हेही वाचा :