विराट कोहली पुढील दोन कसोटीमधूनही बाहेर | पुढारी

विराट कोहली पुढील दोन कसोटीमधूनही बाहेर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पुढील दोन लढतीत देखील खेळू शकणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याशिवाय, पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्चित असल्याचे सध्याचे संकेत आहेत. या मालिकेतील तिसरी व चौथी कसोटी अनुक्रमे राजकोट व रांची येथे खेळवली जाणार आहे. त्यानंतर पाचवी व शेवटची कसोटी धर्मशाळा येथे दि. 6 मार्चपासून होणार आहे.

यापूर्वी, 22 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध मालिका अवघ्या तीन दिवसांच्या उंबरठ्यावर असताना विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने अचानक जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. वास्तविक, पहिल्या लढतीत सहभागासाठी विराट हैदराबादमध्ये दाखलही झाला होता. मात्र, नंतर त्याला अचानक परत फिरावे लागले होते. विराट पुढील दोन कसोटीतही खेळणार नसला तरी यापूर्वीप्रमाणे आताही बीसीसीआयने याबाबत आणखी कोणताही तपशील दिलेला नाही. विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्मा, संघव्यवस्थापन व निवड समितीशी संपर्क साधून त्यांना याबद्दल माहिती दिली असल्याचे यावेळी मंडळाने जाहीर केले.

दुखापतीने त्रस्त असलेले के.एल. राहुल व रवींद्र जडेजा यांच्या तंदुरुस्तीबाबत एनसीएत वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. एनसीए फिजीओंचा याबाबत अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, हे दोन्ही खेळाडू तिसर्‍या कसोटीसाठी उपलब्ध असतील, असे प्राथमिक चित्र आहे.

सिराजचे स्थान जवळपास निश्चित

राजकोट येथील तिसर्‍या कसोटी सामन्यात सिराजचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 11 षटके गोलंदाजी केली. त्यानंतर दुसर्‍या कसोटी सामन्यातून त्याला विश्रांती देण्यात आली. अतिरिक्त भार हलका करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. सिराज संघात परतत असल्यास बुमराहच्या साथीने भारताची गोलंदाजी आघाडी आणखी भरभक्कम होईल, हे स्पष्ट आहे.

राजकोटमधील स्टेडियमचे तिसर्‍या कसोटीपूर्वी नामकरण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका पहिल्या दोन सामन्यांनंतर एव्हाना रोमांचक वळणावर पोहोचली आहे. तिसरी कसोटी दि. 15 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी राजकोट क्रिकेट स्टेडियममध्ये मोठा बदल होणार आहे. तिसर्‍या कसोटीच्या एक दिवस आधी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला नवीन नाव मिळणार आहे. या स्टेडियमला माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू आणि अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी सामन्याच्या पूर्वसंध्येला दि. 14 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे.

हेही वाचा…

Back to top button