प्रशिक्षक राहुल द्रविड ऑफ स्पिनर झाला! - पुढारी

प्रशिक्षक राहुल द्रविड ऑफ स्पिनर झाला!

कानपूर : पुढारी ऑनलाईन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे गुरुवारी ( दि. २५ ) सुरु होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. राहुल द्रविड भारतीय पुरुष संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतरची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धची टी २० मालिका भारताने ३ – ० अशी आरामात जिंकली आहे.

दरम्यान, हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भिडले होते. तो सामना न्यूझीलंडने ८ विकेट राखून जिंकला. त्यानंतर आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ते एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहे. दोन्ही संघ कानपूरच्या ग्रीन पार्कवर आपला सराव करत आहेत. दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंधेला राहुल द्रविडने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

राहुल द्रविड भारतीय संघ सराव करत असताना गोलंदाजी करताना दिसला. त्याने चेंडू हातात घेत नेटमध्ये ऑफ स्पिन गोलंदाजी केली. राहुल द्रविड ज्यावेळी संघात खेळत होता त्यावेळी त्याच्यावर भारताचा डाव सारवण्या बरोबरच विकेट किपिंगचीही अतिरिक्त जबाबदारी दिली होती. त्याने ही जबाबदारी आनंदाने पार पाडली. याचबरोबर संघाचे कर्णधारपदही उत्तम प्रकारे सांभाळले होते.

राहुल द्रविड : नेटमध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

आता त्याने प्रशिक्षक असतानाही नेटमध्ये फलंदाजांना फिरकीचा सराव व्हावा यासाठी स्वतः ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याचा हा नेटमध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्यासाठी ब्रेक घेतला आहे. तो वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात परतणार आहेत. विराटच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे.

पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनाही बायो बबलमधून सुटका मिळाली असून त्यांनही विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुल हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संपूर्ण कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे.

हेही वाचा : 

Back to top button