अजिंक्य रहाणे विराटच्या अनुपस्थिती ‘या’ खेळाडूला देणार पदार्पणाची संधी | पुढारी

अजिंक्य रहाणे विराटच्या अनुपस्थिती 'या' खेळाडूला देणार पदार्पणाची संधी

कानपूर : पुढारी ऑनलाईन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका २५ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणे याच्या खांद्यावर असणार आहे. दरम्यान, भारताचा सलामावीर केएल राहुल दुखापतीमुळे दोन्ही कसोटी सामन्यांना मुकला आहे. त्याच्या जागी टी २० स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी विराटच्या जागेवर सूर्यकुमार खेळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

मात्र मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणेने मुंबईच्याच सूर्यकुमारला प्राधान्य न देता दुखापतीतून सावरत भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवलेल्या श्रेयस अय्यरला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर देखील मुंबईचाच खेळाडू आहे. कानपूरच्या ग्रीन पार्कवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सध्या सराव करत आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने श्रेयस अय्यर हा कसोटी पदार्पण करणार असल्याचे सांगितले.

भारत या सामन्यात ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी यांना विश्रांती देणार आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोणत्या कॉम्बिनेशनने अंतिम ११ चा संघ निवडणार हे पहावे लागेल. फिरकी विभागाची धुरा अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यावर असणार आहे. यातील कोण अंतिम ११ मध्ये खेळणार हेही पहावे लागणार आहे.

अजिंक्य रहाणे – द्रविड समोर संघाचे कॉम्बिनेशन ठरवण्याचे आव्हान

वेगवान गोलंदाजीचा विचार करता इशांत शर्मा आणि उमेश यादव हे पहिली पसंती असण्याची शक्यता आहे. त्यांना कानपूरमधील ग्रीन पार्कच्या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. जसजसा सामना पुढे सरकेल तसतशी खेळपट्टी रिव्हर्स स्विंगसाठी पोषक होईल.

फलंदाजीचा विचार करता सलामीला मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल येण्याची शक्यता आहे. ही मालिका अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.

न्यूझीलंडचा विचार करता केन विलियमसन कसोटी मालिकेसाठी संघात परतणार आहे. त्याने टी २० मालिकेत विश्रांती घेतली होती. तर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा कायल जेमिसन, टीम साऊदी आणि नील वॅगनर हे वाहणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button