Test Cricket : डावखुर्‍या विदेशी फिरकीपटूंची भारताविरुद्ध कसोटीतील संस्मरणीय कामगिरी | पुढारी

Test Cricket : डावखुर्‍या विदेशी फिरकीपटूंची भारताविरुद्ध कसोटीतील संस्मरणीय कामगिरी

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. पदार्पणाची कसोटी खेळणार्‍या टॉम हार्टलीने इंग्लिश संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या युवा डावखुर्‍या गोलंदाजाने भारताच्या दुसर्‍या डावात 7 बळी घेतले. भारतीय भूमीवर डावखुर्‍या विदेशी फिरकीपटूंनी केलेल्या काही संस्मरणीय कामगिरीवर एक नजर टाकूया. (Test Cricket)

क्लार्कचा वानखेडेवर बळींचा ‘षटकार’

ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या मायकेल क्लार्कनेही आपल्या डावखुर्‍या फिरकीने भारताविरुद्ध चांगली छाप पाडली. 2004 च्या वानखेडे कसोटीत त्याने सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्या सामन्यात भारत एकवेळ दुसर्‍या डावात 3 बाद 153 धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर क्लार्कने फिरकीचे जाळे टाकले आणि त्यात अवघ्या 9 धावा देऊन 6 फलंदाजांना पकडले. ज्यामुळे भारताचा डाव अवघ्या 205 धावांवर आटोपला. मात्र, त्याची ही उत्कृष्ट गोलंदाजी कांगारू संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली अन् भारताने तो सामना जिंकला. (Test Cricket)

माँटीच्या वानखेडेवर 11 विकेट

इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज माँटी पानेसरने वानखेडे मैदानावर अप्रतिम कामगिरी केली. 2012 च्या त्या सामन्यात त्याने एकूण 11 विकेटस् (5/129 आणि 6/81) घेतल्या होत्या. पानेसरच्या फिरकीमुळे भारतीय संघाच्या 9 फलंदाजांना सामन्याच्या चौथ्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. उल्लेखनीय म्हणजे तो सामना इंग्लंडने 10 गडी राखून जिंकला होता.

पुण्यात ओकीफच्या डझनभर विकेट

माजी ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज स्टिव्ह ओकीफ याने 2017 मधील पुणे कसोटीच्या दोन्ही डावांत 6-6 विकेटस् घेतल्या होत्या. पहिल्या डावात 13.1 षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात 6 बळी मिळवले, तर दुसर्‍या डावात 15 षटके टाकून 35 धावा दिल्या आणि भारताच्या टॉप 7 पैकी 6 फलंदाजांना बाद केले. ओकीफच्या अचूक मार्‍यामुळे भारताला आपल्या दोन्ही डावांत 105 आणि 107 धावाच करता आल्या. ज्यामुळे टीम इंडियाने तो सामना 333 धावांनी गमावला.

वानखेडेवर एजाज पटेलचा ‘10 का दम’

न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने 2021 च्या वानखेडे कसोटीत भारताविरुद्ध एका डावात 10 बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने भारताच्या पहिल्या डावात 119 धावा देत सर्व 10 फलंदाजांना तंबूत पाठवले होते. याचबरोबर तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटी डावात 10 बळी घेणारा तिसरा कसोटी गोलंदाज ठरला होता. पटेलच्या अविश्वसनीय कामगिरीनंतरही किवी संघाला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

हैदराबादमध्ये ‘हार्ट’ली टॅक

हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात हार्टली महागडा ठरला होता. त्याने 25 षटकांत 5.20 च्या इकॉनॉमी रेटने 131 धावा देत 2 बळी घेतले; पण दुसर्‍या डावात त्याने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे हार्टलीने फेकलेल्या फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकले. त्यानंतर अक्षर पटेल, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज यांच्या विकेट मिळवून इंग्लिश संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 26.2 षटकांत 62 धावा देताना 7 विकेट घेतल्या. (Test Cricket)

हेही वाचा :

Back to top button