IND vs NZ 1st test : पहिल्या दिवसाअखेर भारत २५८/४, श्रेयस अय्यर शतकाच्या उंबरठ्यावर

IND vs NZ 1st test Match day 1
IND vs NZ 1st test Match day 1
Published on
Updated on

IND vs NZ 1st test : कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसा अखेर टीम इंडियाने ४ विकेट गमावून २५८ धावा केल्या. क्रीजवर श्रेयस अय्यर (७५) आणि रवींद्र जडेजा (५०) आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये ११३ धावांची भागिदारी पूर्ण झाली आहे. खराब प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ ८४ षटकेच खेळवण्यात आला. तत्पूर्वी, टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरला आहे. रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू कसोटी मालिकेचा भाग नाहीत. त्याचबरोबर विराट कोहलीलाही पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर केएल राहुलही सामन्याच्या दोन दिवस आधी दुखापतीमुळे दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडला होता. दुसरीकडे, केन विल्यमसन, रॉस टेलर आणि काइल जेमिसन यांच्या पुनरागमनामुळे किवीज खूपच मजबूत दिसत आहेत.

जडेजाचे अर्धशतक

अष्टपैलू रवींद्र जडेजाने ९९ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. रवींद्र जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे १७ वे अर्धशतक आहे. जडेजाची मायदेशातील कसोटीत शेवटच्या पाच डावांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.. ९१, ५१, नाबाद ६०, १२, नाबाद ५०

जडेजा-अय्यरची शतकी भागीदारी

टीम इंडियाने १४५ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी ५ व्या विकेटसाठी ११३ धावा जोडून टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्याची एकही संधी दिली नाही आणि हुशारीने फलंदाजी केली.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

विराट कोहलीच्या जागेवर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने ९४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पदार्पणाच्या कसोटी डावात ५०+ धावा करणारा अय्यर हा भारताचा ४७ वा खेळाडू ठरला. त्याच वेळी, अय्यर भारतीय भूमीवर कसोटी डावात ५०+ धावा करणारा २५ वा खेळाडू ठरला. तसेच, अय्यर आपल्या कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात न्यूझीलंडविरुद्ध ५०+ धावा करणारा चौथा भारतीय ठरला. सुरेंदर अमरनाथ (१२४), कृपाल सिंग (नाबाद १००), देवांग गांधी (७५) आणि बापू नाडकर्णी (नाबाद ६८) यांची नावे त्यांच्यासमोर येतात.

श्रेयस अय्यर-रवींद्र जडेजा जोडीचे अर्धशतक

कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा मैदानात उतरला. चहापानापर्यंत जडेजा ६ आणि अय्यर १७ धावांवर खेळत होते. चहापनानंतर दोघांनी संयमाने खेळी करत धावा काढल्या. ६५.३ व्या षटकात दोघांनी ५० धावांची भागिदारी पूर्ण केली.

जेमिसनसमोर भारतीय फलंदाज 'फेल'

टीम इंडियाची पहिली विकेट ७.५ व्या षटकात मयंक अग्रवालच्या रूपात पडली. मयंकने (१३) धाव करत काइल जेमिसनच्या चेंडूवर टॉम ब्लंडेलकडे त्याचा झेल दिला. त्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने १३३ चेंडूत ६१ धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर पहिल्याच षटकात जेमिसनने गिलला (५२) क्लीन बोल्ड करून न्यूझीलंडला आणखी एक यश मिळवून दिले. टीम साऊदीने पुजाराला (२६) बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. रहाणे आणि अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी ७० चेंडूत ३९ धावांची भागीदारी केली. ही जोडी क्रिजवर स्थिरावणार असे वाटत असतानाच जेमिसनने रहाणेला (३५) बोल्ड केले.

रहाणेला डीआरएसवर मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेता आला नाही…

काइल जेमिसनच्या गोलंदाजीवर (४९.१ वे षटक) रहाणेला पंचांनी बाद घोषीत केले. पण रहाणेने लगेच डीआरएस घेतला. चेंडू रहाणेच्या बॅटला लागला नसल्याचे डीआरएसमध्ये स्पष्ट झाले. यामुळे त्याला एकप्रकारे जीवदान मिळाले. पण पुढच्याच चेंडूवर जेमिसनने त्याला बोल्ड केले. अजिंक्य रहाणे ६३ चेंडूत ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

चेतेश्वर पुजाराकडून निराशा

चेतेश्वर पुजाराने ३ जानेवारी २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले. यानंतर २३ कसोटी सामन्यांच्या ३९ डावांमध्ये ९१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. दरम्यान, तो केवळ ११ अर्धशतके करू शकला कानपूर टेस्टमध्ये आज त्याला ८८ चेंडूत २६ धावा करता आल्या.

अर्धशतकानंतर शुभमन बाद…

शुभमन गिलने ८१ चेंडूत कसोटी क्रिकेटमधील चौथे अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंड दौऱ्यापूर्वी, जायबंदी झाल्याने गिल संघाबाहेर होता. पण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत त्याने अर्धशतक झळकावून शानदार पुनरागमन केले. युवा सलामीवीराने ७ डावांनंतर ५०+ धावा केल्या आहेत. गिलचा डाव ५२ धावांवर संपुष्टात आला. मात्र, त्याची फलंदाजी पाहता तो मोठी खेळी खेळू शकेल, असे वाटत होते. गिल (२२ वर्षे ७८ दिवस) कानपूरमध्ये कसोटी अर्धशतक करणारा दुसरा तरुण भारतीय ठरला. पहिल्या क्रमांकावर एमएल जस्सिमहा (२१ वर्षे २८८ दिवस) हे आहेत.

डीआरएसने गिलला वाचवले…

तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टीम साऊदीने शुभमन गिलविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले. पंचांनी गिलला बाद घोषित केले. तथापि, पंचांच्या निर्णयानंतर लगेचच, शुबमनने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू पहिला बॅटवर लागला आणि त्यानंतर तो पॅडवर आडळला, त्यामुळे गिलला नॉट आऊट असल्याचे स्पष्ट झाले.

IND vs NZ 1st test : लाईव्ह अपटेड 

पहिल्या दिवशी भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात २५८ धावा केल्या. श्रेयस अय्यर ७५ आणि रवींद्र जडेजा ५० धावांवर नाबाद आहेत. खराब प्रकाशामुळे केवळ ८४ षटकेच खेळता आली.

जडेजा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. भारताने २५० धावांचा टप्पा ८२ व्या षटकांत गाठला. अय्यर ६९ आणि जडेजा ४९ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये आतापर्यंत १०५ धावांची भागीदारी झाली आहे.

न्यूझीलंडने ८० व्या षटकांनंतर नवा चेंडू घेतला आहे. टीम साऊथीने पहिले षटक नवीन चेंडूने टाकले, ज्यात भारताच्या फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. सध्या भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात २४१ धावा आहे. श्रेयस अय्यर ६९ आणि रवींद्र जडेजा ४० धावांवर खेळत आहेत.

७८ षटकांचा खेळ संपल्यानंतर भारताने ४ बाद २३७ धावा केल्या. श्रेयस अय्यर ६७ आणि रवींद्र जडेजा ३८ धावा करून नाबाद आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत ९२ धावांची भागीदारी झाली आहे.

७५ षटकांचा खेळ संपला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात २३३ आहे. श्रेयस अय्यर ६५ आणि रवींद्र जडेजा ३६ धावा करत खेळत आहे. आयरने आतापर्यंत १११ चेंडूंचा सामना केला आणि त्यात सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचबरोबर जडेजाने ७१ चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले आहेत.

श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. अय्यरने ९४ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. याचबरोबर भरताची धावसंख्या २०० पार गेली आहे. ६८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद २०२ आहे.

६६ षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १९५ अशी होती. श्रेयस अय्यर ४६ आणि रवींद्र जडेजा १७ धावा करून खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये ९७ चेंडूत ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.

६२ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १७७ आहे. श्रेयस अय्यर ३१ आणि रवींद्र जडेजा १४ धावा करून खेळत आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत ३२ धावांची भागीदारी झाली आहे. कर्णधार विल्यमसनने दोन्ही बाजूंनी फिरकीचा मारा सुरू केला आहे. अशा स्थितीत जडेजा आणि अय्यरला धावा करण्याची मोठी संधी आहे.

५८ षटकांच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १६२ आहे. श्रेयस अय्यर २४ आणि रवींद्र जडेजा ७ धावा करून मैदानावर

रविंद्र जडेजा (६ धावा) आणि श्रेयस अय्यर (१७) मैदानावर

चहापानापर्यंत भारताची धावसंख्या ५६ षटकांत ४ बाद १५४

भारताच्या ५० षटकात ४ बाद १४५ धावा

कर्णधार अजिंक्य रहाणेकडून पुन्हा निराशा; ३५ धावा करुन झाला बोल्ड

भारताच्या ४५ षटकात ३ बाद १२७ धावा

भारताला उपहारानंतर दोन धक्के, गिल ५२ तर पुजारा २६ धावा करुन बाद

भारताच्या उपहारापर्यंत २९ षटकात १ बाद ८२ धावा

शुभमन गिलने ८० चेंडूत ठोकले अर्धशतक

भारताच्या २६ षटकात १ बाद ७९ धावा

भारताच्या १४ षटकात १ बाद ३६ धावा

भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल १३ धावांवर बाद

भारताच्या ५ षटकात बिनबाद ७ धावा

भारत अक्षर, जडेजा, अश्विन हे तीन गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार

श्रेयस अय्यर करणार कसोटी पदार्पण

भारताने नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news