चक्क निळा लाव्हा बाहेर सोडणारा ज्वालामुखी | पुढारी

चक्क निळा लाव्हा बाहेर सोडणारा ज्वालामुखी

जकार्ता : जगभरात अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. मात्र त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असतो तो कावा इजेन ज्वालामुखी. त्याला ‘ब्ल्यू फायर क्रेटर’ असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या ज्वालामुखीतून लालभडक नव्हे तर निळाशार लाव्हा बाहेर पडतो. रात्रीच्या वेळीही त्याचा हा चमकदार निळा लाव्हा लोकांचे लक्ष वेधून घेतो.

इंडोनेशियाच्या या कावा इजेन ज्वालामुखीचा रंग निळा-जांभळा आहे. या रंगामुळे हा ज्वालामुखी अनेकांना अ‍ॅनिमेशनपटांची आठवण करून देतो. त्याचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर करण्यात आला. तो पाहून अनेक लोक थक्क झाले. एका यूजरने म्हटले, मला हा लाव्हा आवडतो, पण कदाचित तो धोकादायकही असावा. एका यूजरने तर त्याचा निळा रंग पाहून आपल्याला त्यामध्ये आंघोळ करण्याची इच्छा असल्याचे म्हटले! दुसर्‍या एका यूजरने तो एकदा पिण्याचीही इच्छा व्यक्त केली. हा निसर्गाचा एक चमत्कार आहे असे एकाने म्हटले.

इंडोनेशियाच्या बनयुवांगीमधील हा ज्वालामुखी अर्थातच पर्यटकांचे आकर्षण आहे. तो पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. हे लोक हायकिंग करून ‘याचि देही याचि डोळा’ हा निळा लाव्हा पाहतात. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना मास्क वगैरे परिधान करावे लागते. याचे कारण म्हणजे ज्वालामुखीतून हानीकारक वायू बाहेर येत असतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या ज्वालामुखीच्या क्रेटरचे तापमान 600 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असते.

Back to top button