मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज ब्लॉक | पुढारी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज ब्लॉक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत मुंबई वाहिनीवर 9.800 किमी (पनवेल एक्झिट) आणि 29.400 किमी (खालापूर टोल प्लाझा व मडप बोगद्यादरम्यान) दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या गुरुवारी (दि. 11 जानेवारी) दुपारी 1.30 वा. ते दुपारी 3.30 या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.

गॅन्टी बसविण्याच्या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या तसेच जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस ही खोपोली एक्झिट 39.800 किमीमधून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

तसेच, पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड-अवजड वाहने ही खालापूर टोलनाका येथील डाव्या बाजूकडील शेवटची लेन खालापूर एक्झिटमधून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खालापूर शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

हेही वाचा

Back to top button