AUS vs WI : वॉर्नरच्या निवृत्तीनंतर कसोटीत ‘या’ खेळाडूचे नशीब पलटले; वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघ जाहीर | पुढारी

AUS vs WI : वॉर्नरच्या निवृत्तीनंतर कसोटीत 'या' खेळाडूचे नशीब पलटले; वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघ जाहीर

पु़ढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर डावखुरा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू रेनशॉचे संघात पुनरागमन झाले आहे. कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि मार्कस हॅरिस  यांना मागे टाकत त्याने संघात स्थान मिळवले आहे. (AUS vs WI)

दुसरीकडे, पॅट कमिन्सला वनडेत विश्रांती दिल्यामुळे स्टीव्ह स्मिथला मालिकेसाठी कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज संघ 17 आणि 25 जानेवारीला ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे.

शेफिल्ड शिल्डमध्ये सर्वाधिक धावा करणारा बॅनक्रॉफ्ट संघात पुनरागमन करू शकतो, अशी बरीच चर्चा होती. तो 2018 मध्ये बॉल टॅम्परिंगच्या वादात अडकला होता. परंतु निवड समितीने रेनशॉला प्राधान्य देत संघात सामिल करून घेतले आहे. फलंदाजीमध्ये तो वेगवेगळ्या क्रमाकांवर फलंदाजी करू शकतो. त्याने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद 136 धावांची खेळी केली होती. रेनशॉ भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. (AUS vs WI)

तर स्टिव्ह स्मिथ देणार सलामी

तथापि, निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी कॅमेरून ग्रीनचे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याने रेनशॉ राखीव फलंदाज राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या इलेव्हनमध्ये ग्रीन कोणत्या क्रमकांवर फलंदाजी करेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, अशी शक्यता आहे. वॉर्नर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने अलीकडेच फलंदाजीची सलामी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

लान्स मॉरिसला वनडेत संधी

स्टीव्ह स्मिथ वनडे मालिकेचे नेतृत्व करणार आहे. वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मार्कस स्टॉइनिसला वगळण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या पॅट कमिन्सला मिचेल मार्शसह विश्रांती देण्यात आली आहे. मार्शने दक्षिण आफ्रिकेत संघाचे नेतृत्व केले. मेलबर्न, सिडनी आणि कॅनबेरा येथे होणाऱ्या तीन सामन्यांमध्ये मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनाही विश्रांती मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नरने गेल्या आठवड्यात या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तथापि, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी त्याने अजूनही दरवाजे खुले ठेवले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, झाय रिचर्डसन, मॅट शॉर्ट, ॲडम झाम्पा.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

हेही वाचा : 

Back to top button