Bribery : सातबारा नोंदीसाठी मागितली 30 लाखांची खंडणी | पुढारी

Bribery : सातबारा नोंदीसाठी मागितली 30 लाखांची खंडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केल्यानंतर सातबारा नोंद करून देण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करून अठरा लाख रुपये खंडणी स्वरुपात घेतले. त्यानंतर सातबारा नोंद होण्यासाठी हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी कैलास परशुराम कडू (रा.जय भवानीनगर, पौड रस्ता), सचिन कैलास कडू (रा.शिवणे) या दोघांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बारामतीतील 31 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ही घटना थेऊरमधील मंडल अधिकारी कार्यालयाच्या समोर घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी दिलीप कडू आणि इतरांकडून 106 गुंठे जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केली. त्या जमिनीची सातबारावर नोंद होऊन देण्यासाठी दिलीप कडू यांचे नातेवाईक असलेले आरोपी कैलास आणि सचिन यांनी संगनमत करून पैशाची मागणी केली. खरेदीखतातील उल्लेखीत रकमेव्यतिरिक्त फिर्यादींकडून प्रथम अठरा लाख रुपयांची खंडणी स्वरुपात घेतले. त्यानंतर वेळोवेळी दीड लाख रुपये घेऊन सातबारा नोंद होण्यास हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी फिर्यादींना आणखी तीस लाख रुपयांची खंडणी मागून, ती न दिल्यास सातबारा नोंद होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोडके करत आहेत.

Back to top button