Cape Town Pitch Issue : केपटाऊनच्या खेळपट्टीवर आयसीसीचे ‘ताशेरे’, रेटींगही केले जाहीर | पुढारी

Cape Town Pitch Issue : केपटाऊनच्या खेळपट्टीवर आयसीसीचे ‘ताशेरे’, रेटींगही केले जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cape Town Pitch Issue : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका केपटाऊन कसोटीतील खराब खेळपट्टीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निकाल दिला आहे. न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्याची खेळपट्टी असमाधानकारक होती, असे म्हणत आयसीसीने त्याचे रेटींग जाहीर केले आहे. आयसीसीच्या खेळपट्टी आणि आउटफिल्ड निरीक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर चिंता व्यक्त केली आहे.

दुसरा कसोटी सामना हा आतापर्यंतचा सर्वात लहान कसोटी सामना ठरला आणि तो दोन दिवसातच संपला. या सामन्यात एकूण 107 षटकांचा खेळ झाला. यादरम्यान 33 विकेट पडल्या. यजमान द. आफ्रिकेचा संघ दोन वेळा ऑल आऊट झाला. तर 79 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आपल्या दुस-या डावात तीन विकेट गमावल्या. दुसरी कसोटी जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही या खेळपट्टीवर टीका केली होती. जत भारतीय खेळपट्टीवर सामना दोन दिवसांत संपला असता तर त्यावर वाद सुरू झाला असता, असा टोमणा त्याने मारला होता. (Cape Town Pitch Issue)

सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड म्हणाले की, ‘न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण होते. संपूर्ण सामन्यात चेंडू पटकन आणि काहीवेळा धोकादायक रीतीने उसळी घेत होता, ज्यामुळे फटके मारणे अवघड बनले होते. अनेक फलंदाजांच्या हातमोज्यांवर चेंडू आदळला. ज्यामुळे खेळाडू जखमी होण्याची शक्यता होती. खेळपट्टीवरील असंतुलित उसळीमुळे अनेक विकेट्सही पडल्या आणि सामना दोनच दिवसात संपला.’

Back to top button