Ishan Kishan : भारतीय संघातून इशान किशन अचानक का गायब झाला? | पुढारी

Ishan Kishan : भारतीय संघातून इशान किशन अचानक का गायब झाला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ishan Kishan : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची यष्टिरक्षक म्हणून निवड केली आहे. तर इशान किशनला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. काही काळापासून इशानला चांगली कामगिरी करता आलेली नाही. यामुळे 2024 च्या टी-20 विश्वचषकात त्याच्या खेळण्याबाबतचा सस्पेंसही वाढला आहे. त्यामुळे इशानला टी-20 संघात स्थान न देऊन निवडकर्त्यांनी फक्त टी-20 फॉरमॅटमध्ये संजू आणि जितेशवर अवलंबून राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

कसोटी आणि एकदिवसीय संघांमध्ये इशानचे स्थान केएल राहुलने घेतले आहे. राहुल हा आता त्या फॉरमॅटमधील पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक बनला आहे. दुसरीकडे ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर ईशानला संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळवणे अधिक कठीण होऊ शकते. सध्या ईशान भारतीय संघाबाहेर आहे आणि त्याच्याबाबत अनेक दावे केले जात आहेत. (Ishan Kishan)

एका संकेतस्थळानुसार, इशानने (Ishan Kishan) काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या परवानगीशिवाय एका टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याबाबत पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर असताना इशान किशन 17 डिसेंबर रोजी संघातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आजतागायत बीसीसीआयला त्याच्या पुढील उपलब्धतेबद्दल माहिती दिलेली नाही, असेही अहवालात म्हटले आहे. याच कारणास्तव निवड समितीने इशानचा विचार केलेला नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप कोणत्याही दाव्याची पुष्टी झालेली नाही. इशानची रजा किती दिवसांची असेल हे अद्याप कळू शकलेले नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून ब्रेक

ईशान किशनने (Ishan Kishan) वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडण्याची परवानगी मागितली होती. यानंतर बीसीसीआयनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि इशान संघातून रिलीज केले. अशाप्रकारे तो कसोटी संघातून बाहेर पडला आणि त्याच्या जागी केएस भरतला संधी मिळाली. इशाने शेवटचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. पण आता अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची संघात निवड झालेली नाही. तो राष्ट्रीय संघातून अचानक गायब झाला आहे.

याशिवाय इशानने रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात झारखंड संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते इशान किशनशी संपर्क साधतील आणि मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या निवडीबाबत निर्णय घेतील. पण त्याच्याशी कोणीही संपर्क करू शकलेले नाही. झारखंडच्या त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फारसे यश मिळाले नाही.

इशान भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला

इशान किशन टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने 2 कसोटीत 78 धावा, 27 एकदिवसीय सामन्यात 933 धावा आणि 32 टी-20 सामन्यात 796 धावा केल्या आहेत.

Back to top button