ICC World Test Championship : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप; टीम इंडियाची अव्वलस्थानी झेप | पुढारी

ICC World Test Championship : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप; टीम इंडियाची अव्वलस्थानी झेप

दुबई; वृत्तसंस्था : भारताने दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही मोठा फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाने मोठी झेप घेत थेट पहिले स्थान पटकावले आहे. (ICC World Test Championship)

भारताने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले असून, एक गमावला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारत 26 गुणांसह अव्वलस्थानी आहे. संघाची विजयाची टक्केवारी 54 आहे. भारताला आता इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. (ICC World Test Championship)

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला आहे. त्यांनी गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर प्रोटीज संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता; पण काही दिवसांतच त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 50 वर घसरली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या विजयाची टक्केवारी समान आहे.

भारतीय संघाची विजयाची टक्केवारी आता 54.16 आहे, तर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विजयाची टक्केवारी 50-50 आहे. सध्या पाकिस्तान संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यांची विजयाची टक्केवारी सध्या 45.83 आहे. वेस्ट इंडिजचा संघ सातव्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 16.67 टक्के गुण मिळवले आहेत. आठव्या क्रमांकावर इंग्लंड संघ आहे. त्यांची विजयाची टक्केवारी सध्या 15 आहे. त्याच वेळी श्रीलंका हा एकमेव संघ आहे, ज्याने या चक्रात अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

हेही वाचा :

Back to top button