Maharashtra Poliics : आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, संजय राऊतांचा पुनरुच्चार | पुढारी

Maharashtra Poliics : आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, संजय राऊतांचा पुनरुच्चार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. त्यापैकी २३ जागांची उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची (UBT) मागणी काँग्रेसने फेटाळून लावली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम आहोत. जागावाटपाचा फार्म्युला दिल्लीत ठरेल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागावाटपाच्या बाबतीत दिल्लीत आज चर्चेसाठी आहेत”. (Maharashtra Poliics)

“…आजही शिवसेना महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. लोकांचा शिवसेना आणि शरद पवारांना पूर्ण पाठिंबा आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. शिवसेना नेहमीच २३ जागा लढत आली आहे. मागील निवडणुकीत आम्ही १९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे १९ जागांबाबत काहीच बोलू नका. जागावाटपाबाबत काँग्रेसच्या निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी आम्ही सकारात्मक चर्चा करत आहोत…” असे राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Poliics : राम मंदीर कार्यक्रम भाजपाचा पक्षीय कार्यक्रम

अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या संदर्भात बोलत असताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही या निमंत्रणाची वाट बघत बसलो नाही. राम मंदिर कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे. हा पक्षीय कार्यक्रम असल्याने बरेचजण जाणार नाहीत. प्रभू श्री राम सर्वांचेच आहेत. भाजपला त्यांचा झेंडा फडकवू द्या. २०२४ ला आम्ही परिवर्तन घडवून आणू.

शिंदे गटाला भाजपमध्ये विलिन व्हावे लागणार.

शिवसेना फुटीसंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, “पार्टी फुटण्याने फरक पडत नसतो, पक्षीय फुटीनंतरही आम्ही अंधेरीमधील पोटनिवडणूक जिंकलोच. शिंदे भाजपमध्ये विलिन होणार याबद्दल बोलत असताना ते म्हणाले की, ” शिंदेच्या शिवसेनेला भाजपमध्येच विलिन व्हावेच लागणार. शिंदे गटाला भाजपामध्ये विलगकरणाशिवाय पर्याय नाही आणि शिंदे गटाला भाजपाच्या कमळावरचे भुंगे म्हणून फिरावे लागणार.

हेही वाचा:

Back to top button