जयपूर ; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघ नवा कर्णधार रोहित शर्मा आणि नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी सुरू होणार्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
द्रविड आणि रोहित यांच्यासमोर ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा मजबूत संघ तयार करण्यासाठी केवळ 11 महिन्यांचा कालावधी आहे. या दरम्यान त्यांना संघात आवश्यक ते बदल व सुधारणा कराव्या लागतील.
यूएईमधील विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कामगिरीनंतर संघाला हार्दिक पंड्याच्या पर्यायांचा विचार करावा लागला आहे. पंड्याला दुखापत झाल्याने त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्या व्यंकटेश अय्यरकडे हार्दिकचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांतून त्याची क्षमता ही स्पष्ट होईल. अय्यरने आयपीएलमध्ये मोठे फटके मारत सर्वांचे लक्ष वेधले होते. यासोबतच आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणार्या ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, आवेश खान व युजवेंद्र चहल यांनादेखील संघात स्थान मिळाले आहे. आवेश खान व मोहम्मद सिराज यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.
कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड खेळाडूंना ऑस्ट्रेलियन परिस्थिती लक्षात ठेवून पाहतील. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. रोहित आणि उपकर्णधार के. एल. राहुल डावाची सुरुवात करू शकतात. मात्र, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडच्या रुपात संघाकडे आणखीन पर्याय असल्याने काही प्रयोगदेखील पाहायला मिळू शकतात. सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी फलंदाजीस उतरू शकतो.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काईल जेमिन्सन, अॅडम मिल्ने, डॅरेल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, टीम सेफर्ट, ईश सोढी.
'आतापर्यंत फार मोजक्याच खेळाडूंशी संवाद साधला. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान खेळाडूंना डिस्टर्ब करायचे नव्हते. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशी बोलणे झाले होते. ही सुरुवात आहे. त्यामुळे सध्यातरी निरीक्षण करण्याचे काम करेन. आम्ही एकाच गोष्टीवर फोकस करणार असे नाही, सर्व बाजू महत्त्वाच्या आहेत. त्यात दिवसेंदिवस सुधारणा करणे आणि खेळाडू व व्यक्ती म्हणून वाढणे याला प्राधान्य आहे. बायो बबलमुळे खेळाडूंसाठी हा आव्हानात्मक काळ आहे.
विशेषकरून जे तिन्ही फॉरमॅट खेळत आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्व सामने खेळू शकत नाही, हे सत्य स्वीकारायला हवे; पण आम्ही त्यासाठी प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा संघ निवडणार नाही. परंतु, खेळाडूंचे मानसिक आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खेळाडूंचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यावर भर देणार आहे.'
– राहुल द्रविड, मुख्य प्रशिक्षक, भारत'आम्ही आमच्या खेळाडूंना निर्भयपणे खेळण्यास सांगू. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाडूने कशाचीही भीती बाळगू नये हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी मैदानात जाऊन निर्भयपणे खेळले पाहिजे. ते यशस्वी ठरले तर हरकत नाही. यामध्ये माझी आणि प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे. ते या संघात सुरक्षित आहेत हे आपण त्यांना सांगायला हवे.'
– रोहित शर्मा, कर्णधार भारत