बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली घेणार अनिल कुंबळेंची जागा | पुढारी

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली घेणार अनिल कुंबळेंची जागा

दुबई : पुढारी ऑनलाईन

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली हे अनिल कुंबळे यांची जागा घेणार आहेत. त्याची आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आयसीसीने आज ( दि. १७ ) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. अनिल कुंबळे हे गेल्या तीन वर्षापासून आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष होते. तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता कुंबळेंची जागा सौरभ गांगुली घेणार आहेत.

दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी ‘आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून सौरभ गांगुली यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले ‘त्यांचा जगातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून असलेला अनुभव आणि आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांचा एक प्रशासक म्हणून मिळवलेला अनुभव क्रिकेट विषयक निर्णय घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरले.’

‘मी अनिल कुंबळे यांच्या गेल्या ९ वर्षापासूनच्या जबरदस्त नेतृत्वासाठी आभार मानतो. त्यांनी डीआरएस प्रणाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमीत स्वरुपात अंमलात आणण्यात दिलेले योगदान आणि वादग्रस्त गोलंदाजीची शैली हे हा विषयही चांगल्या प्रकारे हाताळला.’ असे म्हणत ग्रेग यांनी अनिल कुंबळे यांचेही आभार मानले.

हेही वाचा : 

याचबरोबर आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सध्याचा फॉरमॅट कायम ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले. सध्याच्या फॉरमॅटनुसार गुणतालिकेतील पहिल्या दोन संघामध्ये चॅम्पियनशिपसाठीचा अंतिम सामना होतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही दोन वर्षे चालते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गव्हर्निंग समितीने अफगाणिस्तानात झालेला सत्ताबदल पाहता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या चार सदस्य असलेल्या समितीचे इम्रान ख्वाजा हे अध्यक्ष असतील. याचबरोबर या समितीत रॉस मॅक्युलम, लॉसन नौडू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांचाही समावेश आहे.

बार्कले म्हणाले की, ‘अफगाणिस्तानात क्रिकेटमुळे अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यांचा राष्ट्रीय पुरुष संघ हा देशासाठी एक अभिमान एकत्मतेचे प्रतिक ठरला आहे. विशेष करुन देशातील तरुणांमध्ये एक सकारात्मक बदलाची जाणीव तयार झाली आहे.’

Back to top button