Rahane-Pujara Career Over : रहाणे-पुजाराच्या कारकिर्दीचा शेवट! सूर्यालाही ‘वॉर्निंग’ | पुढारी

Rahane-Pujara Career Over : रहाणे-पुजाराच्या कारकिर्दीचा शेवट! सूर्यालाही 'वॉर्निंग'

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahane-Pujara Career Over : द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा गुरुवारी (30 नोव्हेंबर) करण्यात आली. या दौर्‍यासाठी तीन मालिकेत तीन वेगवेगळे संघ आणि कर्णधार निवडण्यात आले आहेत. कसोटीसाठी रोहित शर्मा, एकदिवसीय मालिकेसाठी के.एल. राहुल तर पहिल्या 3 टी-20 सामन्यासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असेल. पाचपैकी शेवटच्या 2 टी-20 सामन्यासाठी नंतर संघ निवडण्यात येईल. विशेष बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा भाग नसतील. दोन्ही खेळाडूंनी बीसीसीआयकडे विश्रांतीसाठी विनंती केली होती, जी बोर्डाने मान्य केली आहे. मात्र, ते कसोटी मालिकेतून मैदानावर पुनरागमन करणार आहेत. तसे पाहिले तर, कसोटी मालिकेसाठी बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळाले असले तरी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डच्चू देण्यात आला आहे.

रहाणेला संधी मिळणे कठीण (Rahane-Pujara Career Over)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा उपकर्णधार होता. विंडिजविरुद्धच्या त्या मालिकेत रहाणेला केवळ 11 धावा करता आल्या. अशा स्थितीत त्या मालिकेनंतर निवडकर्त्यांचा रहाणेवरील विश्वास उडाला असल्याचे दिसते. याआधीही रहाणेला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. पण देशांतर्गत आणि आयपीएल 2023 मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि निवडकर्त्यांचे लक्षवेधले. दरम्यानच्या काळात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर जखमी झाले होते. ज्यामुळे जवळपास दीड वर्षांनी त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून कसोटी संघात पुनरागमन केले. मात्र, सरासरी कामगिरीमुळे रहाणेचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला. रहाणे आता 35 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला पुढे संधी मिळणे फार कठीण आहे. अशातच केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फिट आहेत. त्यामुळे रहाणेला कसोटी संघात संधी मिळणे कठीण आहे. मुंबईच्या या फलंदाजाने टीम इंडियासाठी एकूण 85 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 5077 धावा केल्या असून त्याची सरासरी 38.46 आहे. रहाणेच्या नावावर कसोटीत 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत.

रहाणेच्या जागी अय्यर पाचव्या क्रमांकावर

श्रेयस अय्यरने वनडे विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूने मधल्या फळीत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. कसोटी संघात तो आता रहाणेची जागा घेण्यास सज्ज असून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. याशिवाय या बॅटिंग लाइनअपमध्ये यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू असतील. आता युवा खेळाडूंनी कसोटी संघासाठी तयार व्हावे, असा बीसीसीआयचा हेतू स्पष्ट आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याऐवजी युवा खेळाडूंवर अधिक विश्वास ठेवण्यात आला आहे.

अजिंक्य रहाणेची कसोटी कारकीर्द

• 85 सामने, 5077 धावा, 38.46 सरासरी
• 12 शतके, 26 अर्धशतके, 49.50 स्ट्राइक रेट
• 578 चौकार, 35 षटकार

पुजाराची कारकिर्द संपुष्टात? (Rahane-Pujara Career Over)

रहाणे प्रमाणे चेतेश्वर पुजाराही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा भाग होता. त्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 41 धावा आल्या. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले. त्यामुळे पुजाराची डब्ल्यूटीसीची फायनल पुजारासाठी त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरतो की काय अशी चर्चा रंगली आहे. पुजारा, जो जानेवारीत 36 वर्षांचा होणार आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. जिथे आता शुभमन गिल किंवा ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळू शकते. गेल्या 28 कसोटींमध्ये पुजाराची सरासरी केवळ 29.69 इतकी राहिली आहे. या काळात त्याने 1 शतक आणि 11 अर्धशतके झळकावली. डिसेंबर 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या चितगाव कसोटीतील त्याच्या 90 आणि 102* धावांच्या खेळीला बाजूला केले तर ही सरासरी 26.31 वर येते.

मात्र, पुजाराची एकूण कसोटी कारकीर्द चांगलीच राहिली आहे. पण काही वर्षांपासून तो वेगवान गोलंदाजाविरुद्ध संघर्ष करताना दिसला. विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, इंग्लंडच्या जेम्स अँडरसनसारख्या वेगवान गोलंदाजांनी त्याला खूप सतावले. पुजाराने आतापर्यंत 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली. पुजाराची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 आहे, जी त्याने इंग्लंडविरुद्ध केली होती.

चेतेश्वर पुजाराची कसोटी कारकीर्द

• 103 सामने, 7195 धावा, 43.60 सरासरी
• 19 शतके, 35 अर्धशतके, 44.36 स्ट्राइक रेट
• 863 चौकार, 16 षटकार

सूर्यकुमारला सुद्धा ‘वॉर्निंग’

दुसरीकडे, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला वनडे संघात स्थान मिळालेले नाही. सूर्या टी-20 फॉरमॅटमध्ये धडाकेबाज फलंदाजी करतो, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला धावा करण्यासाठी धडपडावे लागते. आतापर्यंत, सूर्याने 37 एकदिवसीय सामन्यांच्या 35 डावांमध्ये 25.76 च्या माफक सरासरीने 773 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूर्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. भविष्यात सुर्याला खराब कामगिरीचे परिणाम भोगावे लागतील अशी चर्चा सुरू आहे.

सूर्यकुमारची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द

• 37 सामने, 773 धावा, 25.76 सरासरी
• चार अर्धशतके, 105.02 स्ट्राइक रेट
• 80 चौकार, 19 षटकार

कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

Back to top button