श्रेयस अय्‍यरचे टीकाकारांना सडेतोड प्रत्‍युत्तर, “मला माहित होतं…” | पुढारी

श्रेयस अय्‍यरचे टीकाकारांना सडेतोड प्रत्‍युत्तर, "मला माहित होतं..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडियाच्‍या खेळाडूंची कामगिरी प्रत्‍येक सामन्‍यानंतर आणखी बहरताना दिसत आहे. दमदार कामगिरी करणार्‍या फलंदाजांमध्‍ये श्रेयस अय्‍यर (Shreyas Iyer ) याचे नाव आघाडीवर आहे. या स्‍पर्धेतील पहिल्‍या उपांत्‍य फेरीत भारताने न्‍यूझीलंड संघाचा ७० धावांनी पराभव करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या उपांत्‍य सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली. सामन्यात विराट कोहलीने वनडे फॉर्मेटमधील 50 वे शतक झळकावले तर श्रेयस अय्यरने 67 चेंडूत शतक झळकावले. या स्पर्धेच्या सुरुवातीला श्रेयस अय्यरची कामगिरी काही विशेष नव्हती, तो शॉर्ट बॉल खेळताना अडचणीचा सामना करताना दिसला. यावरून टीकाकारांनी त्‍याला लक्ष्‍य केले होते. अय्यरने आपल्या फलंदाजीने टीकाकारांना उत्तर दिले आहे.

Shreyas Iyer : उपांत्‍य सामन्‍यात श्रेयसचे धडाकेबाज शतक

न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने ७० चेंडूंत चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. आपल्या खेळीनंतर टीकाकारांना प्रत्युत्तर देताना तो म्हणाला, “विश्वचषकातील पहिल्या एक-दोन सामन्यांमध्ये माझी कामगिरी चांगली नव्हती. मला चांगली सुरुवात झाली, पण सातत्‍य राखण्‍यात अपयश येत होते. आकडेवारी बघितली तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध मी खराब खेळी केल्‍या. काहींनी माझ्‍यावर टीका केली. या टीकेने मला संताप आला होता;पण मी राग व्‍यक्‍त केला नाही. कारण माझी वेळ आल्यावर मी स्‍वत:ला सिद्ध करेन हे मला माहीत होते.”

अय्यरने सप्टेंबरमध्ये आशिया चषकादरम्यान पुनरागमन केले. दुखापतीमुळे तो काही सामन्यांमध्‍ये खेळू शकला नाही. सध्या, विश्वचषक 2023 स्पर्धेत, श्रेयस अय्यरने 10 डावांमध्ये 75.4 च्या सरासरीने आणि 113.12 च्या स्ट्राइक रेटने 526 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button