पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याचा संघात समावेश केला आहे. त्यावर हार्दिक पंड्या याने त्याच्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे. हार्दिक पंड्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "वर्ल्डकपच्या उर्वरित सामन्याला मी मुकणार हे सत्य पचवणे कठीण आहे. मी प्रत्येक सामन्यात संघासोबत असेन. प्रत्येक चेंडूवर मी संघाला प्रोत्साहन देईन."
सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मला मिळालेले प्रेम आणि पाठिंबा अतुलनीय आहे. आमची टीम खास आहे आणि मला खात्री आहे की आम्हा सर्वांना अभिमान त्यांचा अभिमान वाटेल, असेही पुढे पंड्याने म्हटले आहे.
संबंधित बातम्या
बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. पण उपांत्य फेरीपर्यंत पंड्या तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता पंड्याला वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
टीम इंडियाचा पुढील सामना ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) होणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली आहे.
पंड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले आहे.
जसप्रीत बुमराहप्रमाणेच प्रसिद्धही जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त होता. पण त्याचे आयर्लंड दौऱ्यात पुनरागमन झाले होते. आशिया चषक स्पर्धेतही तो भारतीय संघाचा भाग होता. वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियासोबतच्या एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघात प्रसिद्धचा समावेश होता.
हे ही वाचा :