पाकिस्‍तान न्‍यूझीलंडच्‍या पराभवासाठी करणार ‘प्रार्थना’!, जाणून घ्‍या गुणतालिकेचे समीकरण : Cricket World Cup : NZ vs SA | पुढारी

पाकिस्‍तान न्‍यूझीलंडच्‍या पराभवासाठी करणार 'प्रार्थना'!, जाणून घ्‍या गुणतालिकेचे समीकरण : Cricket World Cup : NZ vs SA

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकदिवसीय (वन-डे) क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धा आता निर्णायक टप्‍प्‍यावर आली आहे. मंगळवार, ३१ ऑक्‍टोबर रोजी पाकिस्‍तानने बांगलादेशविरुद्‍ध विजय मिळवत या स्‍पर्धेतील आपल्‍या आशा कायम ठेवल्‍या आहेत. मात्र आता पाकिस्‍तानचे भवितव्‍य अन्‍य संघांच्‍या कामगिरीवर आहे. म्‍हणजे आता पाकिस्‍तानचे भवितव्‍य हे ‘जर-तर’वर अवलंबून आहे. उपांत्य फेरीतील प्रबळ दावेदार न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आज आमने-सामने आहेत. आजच्‍या सामन्‍याकडे पाकिस्‍तानचे विशेष लक्ष असणार आहे. (Cricket World Cup : NZ vs SA ) न्‍यूझीलंडचा पराभव हा पाकिस्‍तानच्‍या पथ्‍यावर पडणार असून, जाणून घेवूया या सामन्‍यानंतर होणार्‍या गुणतालिकेतील नव्‍या समीकरणाविषयी…

यंदाच्‍या विश्वचषक स्पर्धेतील बहुतांश सामने एकतर्फी झाले आहेत; पण दक्षिण आफ्रिकेने चेन्नईमध्ये पाकिस्तानवर एक विकेटने मिळवलेला विजय आणि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमहर्षक सामन्‍यात निर्णायक क्षणी ऑस्‍ट्रेलिया बाजी मारली होती. न्‍यूझीलंडने ३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा अत्‍यंत चिवट पाठलाग केला होता. मात्र ही झूंज व्‍यर्थ ठरली होती.

Cricket World Cup : NZ vs SA : न्‍यूझीलंडसाठी आजचा सामना महत्त्‍वपूर्ण

न्यूझीलंडचे सहा सामन्यांतून आठ गुण आहेत. मात्र धावांची गतीमुळे हा संघ गुणतालिकेत ऑस्‍ट्रेलियापेक्षा सरस ठरला असून तिसर्‍या स्‍थानी आहे. दक्षिण आफ्रिका दुसर्‍या स्‍थानी आहे. त्‍यामुळेच आजचा सामना न्‍यूझीलंडसाठी अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्‍ही संघांचे सहा गुण झाले आहेत.

आजचा सामना जिंकल्‍यास दक्षिण आफिक्रेची उपांत्‍य फेरीत धडक

सलग सहा सामने जिंकत भारताने सर्वप्रथम उपांत्य फेरीत धडक मारली आहे. वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे (दहा गुण) असून हा संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्‍थानी आहे. आजचा न्‍यूझीलंड विरुद्‍धचा सामना जिंकल्‍यास १२ गुणांच्‍या सहाय्‍याने हा संघ उपांत्‍य फेरीत धडक मारेल. त्‍यामुळेच न्‍यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यातील सामन्‍याकडे पाकिस्‍तानबरोबर अफगाणिस्‍तानमधील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

न्‍यूझीलंड संभाव्‍य प्‍लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

दक्षिण आफ्रिका संभाव्‍य प्‍लेईंग 11 : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, लुंगी एनगिडी.

हेही वाचा : 

 

 

Back to top button