विश्वचषकाच्या रणभूमीतून : नवी तंत्रे नवी आशा | पुढारी

विश्वचषकाच्या रणभूमीतून : नवी तंत्रे नवी आशा

निमिष पाटगावकर

निमिष पाटगावकर

भारत आपला सलग पाचवा विजय नोंदवत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दरवाजापाशी पोहोचला आहे. आईस्क्रीमच्या दुकानात जरी सगळी आईस्क्रीम गोडच असली, तरी फ्लेवर्स वेगवेगळे असतात तसे हे आपले सर्वच विजय गोड असले, तरी त्यात प्रत्येक विजयाची चव वेगवेगळी होती. ही चव आणली आपल्या संघातील वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळ्या सामन्यांत कामगिरी करून; पण या सर्व विजयाच्या आईस्क्रीमचे दूध साखरेचे मुख्य घटक होते ते विराट कोहली आणि रोहित शर्मा विराट कोहली आणि रोहित शर्मा आज दोघेही अनुक्रमे ३४ आणि ३६ वयाचे आहेत. या वयाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची जरा जास्तच नजर असते आणि एखाददुसरे अपयश ते संपलेत आता हे लेबल लावून जाते. जुने ते सोने म्हणजे नक्की काय हे या विश्वचषकात या दोघांनी दाखवून दिले.. रोहित शर्माचा फलंदाजीतील बदललेला अॅप्रोच, सकारात्मक कल्पक नेतृत्व आणि विराट कोहलीची विजयाचा झेंडा रोवेपर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून केलेली फलंदाजी ही आपल्या विजयाची मुख्य रेसिपी आहे. त्यात अजून चव आणली कधी राहुल, कधी अय्यर, तर कधी कुलदीप, तर कधी शमीने.

भारताची २०१९ च्या विश्वचषकाची वाटचाल आणि आताची वाटचाल यात साम्य दिसेल. तेव्हा आपण न्यूझीलंडचा पावसामुळे वाहून गेलेला सामना सोडला, तर पहिल्या सहापैकी पाच सामने जिंकून इंग्लंडला सामोरे गेलो होतो आणि आताही तशीच परिस्थिती आहे. फरक आहे तो विजयात. तेव्हा भारताची विजय पताका काही ठराविक खेळाडूंमुळेच फडकत होती. रोहित शर्माची पाच शतके, कोहलीची काही अर्धशतके आणि धवन यांच्या धावा विजय मिळवून द्यायला पुरेशा असायच्या. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. पहिली गोष्ट आपल्या सर्वांना मान्य करायला पाहिजे ती संघ निवडीची. या संघ निवडीवर दुखापतीतून उठलेले राहुल, अय्यर एक दिवसीय सामन्यात उठावदार कामगिरी नसलेला सूर्यकुमार यादव यांच्या निवडीवरून बरीच टीकास्त्रे सोडण्यात आली होती. निवड समिती आम्ही उपलब्ध खेळाडूंतून सर्वोत्तम संघ निवडला आहे, या मतावर ठाम होती. श्रेयस अय्यर आणि राहुल हेच आमचे चार आणि पाच क्रमांकाचे फलंदाज आहेत हे आगरकर, रोहित शर्मा आणि द्रविड एकमताने सांगत होते. अक्षर पटेलच्या ऐवजी अश्विनचा समावेश हे उशिरा सुचलेले शहाणपण नव्हते, तर अश्विन आशिया चषक न खेळता ‘बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या गोलंदाजीतील नवी अस्त्रे बनवत होता. तेव्हा त्याचा समावेश हा अपेक्षितच होता. यामुळे २०१९ च्या संघात आणि आजच्या संघात फरक आहे तो संतुलितपणाचा.

कुठच्याही कर्णधाराला असा संतुलित संघ मिळाला की, मुख्य काम असते ते संघातील प्रत्येकाला आपली भूमिका समजावून द्यायची. रोहित शर्मा स्वतः वेगळ्या भूमिकेतून दिसत आहे. रोहित शर्माचे फुटवर्क पहिले काही चेंडू खेळताना चांगले नसते या वाक्याचा गेली काही वर्षे लिहून चोथा झाला आहे. यंदा रोहित शर्माने फलंदाज म्हणून एकच भूमिका बजावली ती आक्रमणाची. पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्ध्याच्या मुख्य अस्त्राची धार काढून घेऊन पहिल्या पॉवरप्लेमध्ये जलद धावा बनवत उत्तम पाया बनवणे हे त्याचे काम. हे करताना प्रचंड धोका क्षणाक्षणाला आहे; पण तो पत्करून तो खेळला. जर दुर्दैवाने ही भूमिका वठली नाही, तर कोहली एक बाजू लावून बाकीच्या साथीदारांना जोडीला घेऊन डाव सावरेल. पहिल्या सामन्यात आपण हे बघितले. नंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्माने सामनाच जिंकून दिला; पण पुन्हा बांगला देश आणि परवा न्यूझीलंडविरुद्ध कोहली दीपस्तंभासारखा उभा राहिला.

न्यूझीलंडविरुद्ध जेव्हा कोहली आणि अय्यर मैदानात होते. तेव्हा कोहलीने आध वडाची भूमिका घेत अय्यरला मुक्त खेळून दिले. या दोघांच्या ५२ धावांच्या भागीदारीत अय्यरच्या ३३ धावा होत्या. राहुलबरोबर खेळताना दोघांनी डाव सावरण्यावर भर दिला. राहुल बाद झाल्यावर आणि दुर्दैवाने सूर्या धावबाद झाल्यावर कोहलीला त्याचे खेळपट्टीवर विजयापर्यंत राहणे किती गरजेचे आहे हे समजल्याने त्याने पुन्हा जडेजाला धावा जमवण्यात पुढाकार घ्यायला लावले. कोहली-जडेजाच्या ७८ धावांच्या भागीदारीत जडेजाचा वाटा जरी ३५ धावांचा असला, तरी जडेजाने फर्ग्युसनला लागोपाठ दोन चौकार मारून प्रथम सूर्या बाद झाल्यानंतरचे दडपण दूर केले. भारताच्या प्रत्येक विजयाला चव वेगळी आहे, ती यामुळेच. कोहली किंवा रोहित शर्मा यांच्या जोडीला चेन्नईला राहुल, अहमदाबादला श्रेयस, पुण्याला गिल, तर धर्मशाळाला जडेजा उभे राहिले. पंड्याला फलंदाज म्हणून संधी मिळाली नाही, तर सूर्या परवा हकनाक बाद झाला. या दोघांचा एकदा पुढच्या चार सामन्यांत सराव झाला की, आपण उपांत्य फेरीसाठी जास्त चांगले सज्ज असू. आतापर्यंतचे हे पाच विजय भारताच्या अनेक बाजू तपासून बघायला उपयोगी पडले आहेत. मोहम्मद शमीनेही आपल्या अनुभवाच्या जोरावर आपली भूमिका सिद्ध केली. अश्विनला साजेशी खेळपट्टी असेल तेव्हा अश्विन नाही, तर शमी हे आपले सूत्र आहे. पंड्या जर बरे व्हायला वेळ घेणार असेल, तर शार्दूल ठाकूर त्याची जागा घेईल.

कारण, कुणा गोलंदाजाला सूर गवसला नाही, तर आपल्याला सहावा गोलंदाज असणे गरजेचे आहे. एखाद्या बुद्धिबळाच्या डावासारख्या आपल्या चाली तयार आहेत आणि मुख्य म्हणजे, त्या चाली खेळायला योग्य खेळाडू आपल्याकडे आहेत. भारताला गरज आहे ती आता प्रथम फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारायच्या सरावाची. एकदा ते झाले की, आपला संघ सर्व नवी तंत्रे वापरून नव्या आशेसाठी सज्ज आहे, असे म्हणू शकतो. उपांत्य फेरीसाठी सज्ज होऊच; पण त्या आईस्क्रीमवरच्या विश्वचषकाच्या चेरीची अपेक्षा ठेवायलाही काहीच हरकत नाही.

हेही वाचा 

Back to top button