India Vs Bangladesh : विराटचा शतकी तडाखा; भारताचा बांगला देशवर 7 विकेटस्नी विजय

India Vs Bangladesh : विराटचा शतकी तडाखा; भारताचा बांगला देशवर 7 विकेटस्नी विजय

पुणे : शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने ठोकलेला शानदार षटकार आणि केलेल्या शतकी खेळीने संघाला 'विराट' विजय मिळवून देत विजयाचा 'चौकार' साजरा केला. त्याला शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तर हिटमॅनची तडाखेबाज फलंदाजीने साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून बांगला देशला 256 धावांत रोखल्यानंतर विराट कोहली (103*), शुभमन गिल (53) आणि रोहित शर्मा (48) यांनी बांगला टायगर्सचा फडशा पाडला. विराटला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

गहुंजे स्टेडियम येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बांगला देश संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मा याने पहिल्याच षटकात रोहितने दोन चौकार ठोकत दमदार सुरुवात केली. रोहित याने तडाखेबाज फलंदाजी करताना 40 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा केल्या. रोहितने हसन महमूद याच्या 13 व्या षटकामध्ये षटकार ठोकला. तसाच चेंडू पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाँड्रीवर असलेल्या तौहिद हिरदॉय याने झेल पकडला.

रोहित बाद झाला त्यावेळी भारताच्या 88 धावा झाल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीसमवेत शुभमन गिल याने 44 धावांची भागीदारी रचली. शुभमन याने ही तडाखेबाज फलंदाजी करताना 55 चेंडूंत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला मेहदी हसन याने महमदुल्लाह रियाद करवी झेलबाद केले. शुभमन याने दोन षटकार आणि पाच चौकार मारले.

श्रेयस अय्यर याने विराट कोहलीबरोबर मैदानावर सुरुवात करताना सावध खेळी केली. परंतु, श्रेयसला चमकदार कामगिरी दाखविता आली नाही. 25 चेंडूंत दोन चौकारासह केवळ 19 धावाच करता आल्या. त्याला मेहदी हसन याच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात महमदुल्लाह रियाद करवी झेलबाद झाला. त्यावेळी संघाच्या 30 व्या षटकात 3 बाद 178 धावा झालेल्या होत्या. त्यानंतर विराट आणि के. एल. राहुल यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

या दोघांनी 83 धावांची दमदार भागीदारी रचत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताच्या विजयाला दोन धावा हव्या असताना विराटला शतकासाठी 3 धावा हव्या होत्या. यावेळी त्याने उत्तुंग षटकार ठोकत आपले शतक पूर्ण करताना संघाला विजय मिळवून दिला. विराटने 97 चेंडूंत नाबाद 103 धावांची खेळी करताना 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. त्याला के. एल. राहुल याने 34 चेंडूंत 34 धावांची सुरेख साथ देऊन 3 चौकार आणि 1 षटकार मारला.

तत्पूर्वी, चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाजांनी बांगला देशला 8 बाद 256 धावांत रोखले. तनझीद हसन (51) आणि लिट्टन दास (66) यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली; परंतु नंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत बांगला देशला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. तनझीद हसन आणि लिट्टन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली.

प्रभारी कर्णधार नाजमुल हुसैन शांति 8 धावांवर असताना रविंद्र जडेजा याने त्याला पायचीत केले. त्यानंतर मेहदी हसन हा सुध्दा केवळ 3 धावा करुन तंबुत परतला. लिट्टन दासला 66 धावांवर जडेजाने गिल करवी झेलबाद करीत तंबूत पाठविले. महमुदल्लाह रियाद याने 3 चौकार आणि 3 षटकारासह 36 चेंडूत 46 धावांची उत्तम खेळी केली. बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. बांग्लादेशाने निर्धारित 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या.

रोहितने हिट केले अनेक विक्रम

वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा बांगला देशचा संघ समोर असतो तेव्हा रोहितची बॅट विजेसारखी तळपते. गुरुवारी झालेल्या वर्ल्ड क प सामन्यात रोहितने 48 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने आशिया खंडात खेळताना वन डेतील 6000 धावा आज पूर्ण केल्या आणि अनेक विक्रम आपल्या पोतडीत टाकले.

वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 750* धावांचा विक्रम रोहितने नावावर करताना शाकिब अल हसनचा (743) विक्रम मागे टाकला. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंजादांमध्ये रोहितने 1226* (21 इनिंग्ज) चौथे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर (2278), रिकी पाँटिंग (1743) आणि कुमार संगकारा (1532) हे आघाडीवर आहेत. कॅलेंडर वर्षात (2023) सर्वाधिक 61 षटकार मारण्याचा विक्रमही रोहितने नावावर करताना इयॉन मॉर्गनचा 60 (2019) षटकारांचा विक्रम मोडला. भारताने 9 षटकांत फलकावर 50 धावा चढवल्या.

शतक आणि विजय यांच्यातील रेस

बांगला देशने विजयासाठी ठेवलेल्या 257 धावांचा पाठलाग करताना विराट व लोकेश राहुल यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. भारताला विजयासाठी 26 धावांची गरज असताना विराटला शतकासाठी तेवढ्याच धावा हव्या होत्या. विजय आणि शतक यांच्यातील ही रेस विराटने राहुलच्या मदतीने कशी जिंकली ते पाहू…

38 वे षटक संपले तेव्हा विराट 73 आणि लोकेश 33 धावांवर खेळत होते आणि भारताला विजयासाठी 28 धावा करायच्या होत्या. 39 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटने एक धाव घेतली आणि त्यानंतर लोकेशने एक धाव घेत विराटला पुन्हा स्ट्राईक दिला. दोन निर्धाव चेंडूनंतर विराटने षटकार खेचला आणि 1 धाव घेत पुढच्या षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवला. विराट 81 धावांवर पोहोचला होता आणि भारताला 19 धावा हव्या होत्या.

40 व्या षटकाचा पहिला चेंडू विराटने सीमापार धाडला. दोन निर्धाव चेंडूनंतर षटकार अन् पुन्हा एक डॉट बॉल… शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत पुढील षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवला. यावेळी लोकेश राहुलही विराटला उगाच एक धाव घेऊन मला स्ट्राईक देऊ नको, असे सांगत होता. त्याने विराटला शतक पूर्ण करण्यास सांगितले.

41 व्या षटकात हसन महमूदने वाईड चेंडू टाकल्याने विराटचे गणित बिघडले. त्यानंतर त्याने 2,0,2,0,1 अशा धावा काढल्या. 42 व्या षटकात नसूमने वाईड बॉल फेकला होता; परंतु अम्पायरने तो दिला नाही. विराटला शतकासाठी 3 आणि विजयासाठी 2 धावा हव्या होत्या. विराटने षटकार खेचून भारताच्या विजयासोबत शतकही पूर्ण केले. विराटने नाबाद 103 धावा केल्या. राहुल 34 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : 50 षटकांत 8 बाद 256 धावा. (लिट्टन दास 66, तनझीद हसन 51. जसप्रीत बुमराह 2/41, रवींद्र जडेजा 2/38)
भारत : 41.3 षटकांत 3 बाद 261 धावा. (विराट कोहली नाबाद 103, शुभमन गिल 53, रोहित शर्मा 48. मेहदी हसन मिराज 2/47)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news