पाकिस्‍तानसाठी बॅड न्यूज!: शफीक-शाहीनसह ६ खेळाडूंची प्रकृती बिघडली | पुढारी

पाकिस्‍तानसाठी बॅड न्यूज!: शफीक-शाहीनसह ६ खेळाडूंची प्रकृती बिघडली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताने पाकिस्‍तानचा दारुण पराभव केला. यानंतर आता या संघाचा पाय आणखी खोलात गेला आहे. संघाचे ६ महत्त्‍वपूर्ण खेळाडूंची प्रकृती बिघडली आहे. त्‍यामुळे आता शुक्रवारी २० ऑक्‍टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या सामन्‍यालपूर्वी संघ व्‍यवस्‍थापनाचे टेन्‍शन वाढले आहे. ( Cricket ODI World Cup : Pakistan Team )

पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्तानुसार, सराव सत्रापासून दूर राहिलेल्या खेळाडूंमध्ये चार मुख्य संघातील आणि दोन राखीव यादीतील आहेत. मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, शाहीन आफ्रिदी, सलमान अली आगा, जमान खान आणि मोहम्मद हरिस यांनी वैकल्पिक सराव सत्रात भाग घेतला नाही. त्यापैकी जमान आणि हरिस हे राखीव खेळाडू आहेत. पाकिस्तान संघाने सुरुवातीला सराव न करण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर त्यांनी नियोजनात बदल करुन सराव सत्रात सहभाग घेतला.

Cricket ODI World Cup : खेळाडूंची कोरोना आणि डेंग्यू चाचणी

श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक झळकावणारा अब्दुल्ला शफीक तापाने त्रस्त आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि उसामा मीर यांनाही तापाची लक्षणे जाणवत आहेत. तापाची लक्षणे दिसणाऱ्या खेळाडूंची तात्काळ तपासणी करण्यात आली. सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने, सर्व खेळाडूंची कोरोना आणि डेंग्यू तापाशी संबंधित लक्षणांची तपासणी करण्यात आल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

विश्‍वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानने आतापर्यंत तीन सामन्यांतून दोन विजयांची नोंद केली आहे. मात्र या संघाचा भारताविरुद्धच्‍या सामन्‍यात दारुण पराभव झाला. पाकिस्तानला आता ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सामने खेळायचे आहे.

पाकिस्‍तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, एम वसीम जूनियर, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, सौद शकील, सलमान अली आगा.

हेही वाचा : 

Back to top button