World Junior Rapid Chess Championship | नागपूरचा १७ वर्षीय रौनक साधवानी बनला वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन | पुढारी

World Junior Rapid Chess Championship | नागपूरचा १७ वर्षीय रौनक साधवानी बनला वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन

पुढारी ऑनलाईन : नागपूरचा १७ वर्षीय रौनक साधवानी (Maharashtra’s youngest Grandmaster Raunak Sadhwani) याने इटलीमध्ये झालेल्या अंडर-२० वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले आहे. खुल्या विभागात रौनक साधवानी याने ८.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सुरुवातीनंतर धक्क्यानंतर रौनकने तीन खेळाडूंसह अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताच्या या ग्रँडमास्टरने टोबियास कोएले (जो बहुतांश इव्हेंटच्या शर्यतीत आघाडीवर होता) विरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. आर्सेनी नेस्तेरोव्ह आणि दिमित्रीस अलेक्साकिस यांनी त्यांचा गेम बरोबरीत (ड्रॉ) सोडवला. यामुळे हे दोघे ओर ग्लोबस याच्यासह ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. (World Junior Rapid Chess Championship)

 संबंधित बातम्या 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वर्ल्ड चेस फेडरेशन (FIDE) द्वारे आयोजित ११ फेऱ्यांच्या रॅपिड स्पर्धेसाठी सार्डिनिया, इटलीला जाण्यासाठी रौनकला व्हिसा संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी वेळीच याकडे लक्ष देत त्यासाठी सहकार्य केल्याने रौनकला सर्वात वेगवान बुद्धिबळ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करता आले.

त्याची या स्पर्धेतील सुरुवात काहीशी अस्थिर स्वरुपाची राहिली. दुस-या आणि पाचव्या फेरीत रौनकला क्रमवारीत निच्चांकी असलेल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना धक्का बसला होता. एफएम रॉबर्ट पिलीपोस्यान (आर्मेनिया) आणि आयएम कॉन्स्टँटिन पेरेर (ऑस्ट्रिया) यांच्याकडून तो पराभूत झाला होता. दोन पराभवानंतर पाच फेऱ्यांत फक्त तीन गुण मिळवल्यानंतर रौनकने पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित केले आणि त्याने सलग चार गेम जिंकून दुसऱ्या आणि तिसऱ्या मानांकितांसह अव्वल स्थान पटकावले.

जागतिक ज्युनियर रॅपिड चॅम्पियन बनण्यासाठी रौनकने आठ फेऱ्या जिंकल्या. दोन पराभवांना सामोरे जात त्याने ८.५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. हे विजेतेपद जिंकल्यानंतर रौनक म्हणाला, की “हे विजेतेपद जिंकल्याने मला आनंद झाला आहे. मला आता अनेक मोठ्या विजेतेपदांची आशा आहे. मी माझ्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल समाधानी आहे.” ((World Junior Rapid Chess Championship)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत रौनकचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदी यांनी म्हटले आहे, “फिडे वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप २०२३ मधील उल्लेखनीय यशाबद्दल रौनक साधवानीचे अभिनंदन! त्याच्या प्रतिभेने आणि कौशल्याने जगाला आश्चर्यचकित केले आणि त्याचा देशाला अभिमान आहे. तो आपल्या देशातील तरुणांना प्रेरणा देत राहो. त्याच्या अपवादात्मक कामगिरीसह त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.”

हे ही वाचा :

Back to top button