IND vs AUS : भारताची ऑस्ट्रेलियावर ९९ धावांनी मात, २-० ने मालिकेत विजयी आघाडी | पुढारी

IND vs AUS : भारताची ऑस्ट्रेलियावर ९९ धावांनी मात, २-० ने मालिकेत विजयी आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी धुव्वा उडवला. श्रेय़स अय्यर, शुभमन गिलची शतकी खेळी आणि रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विनच्या प्रत्येकी ३ बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर हा विजय मिळवला. ३ सामन्यांच्या मालिकेत २ सामन्यांत विजय मिळवत भारताने विजयी आघाडी घेतली आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने ५० षटकांअखेर ३९९ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर ४०० धावांचे आव्हान ठेवले.

भारताच्या ४०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शॉर्ट आणि स्मिथच्या रूपाने सुरुवातीच्या काही विकेट गमावल्या, त्यामुळे धावांचा पाठलाग करणे आणखी कठीण झाले. दुसऱ्या पावसाच्या विश्रांतीमुळे पाहुण्यांसाठी परिस्थिती आणखीनच बिकट झाली. कारण ३३ षटकांत ३१७ धावांचे लक्ष्य देण्यात आले. धावफलकावर दबाव वाढत असताना, रविचंद्रनने आक्रमणात उतरून तीन बळी घेत पाहुण्या संघासाठी धावांचे आव्हान अशक्य केले. काही ऑस्ट्रेलियन फलंदाज आश्वासक दिसले. मात्र, अश्विन-जडेजाच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाने अक्षरश: नांगी टाकली.

शुभमन- श्रेयसची धडाकेबाज शतकी खेळी

ऑस्‍ट्रेलियाने टाॅस जिंकत प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र शुभमन गिल, श्रेयस अय्‍यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. श्रेयस अय्यरने ८६ बॉलमध्ये आपले शतक केले. यामध्ये त्याने १० चौकार आणि ३ षटकार लगावले. भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने सामन्याच्या ३२ व्या ओव्हरच्या बॉलवर एकेरी धाव घेत त्याने आपले धडाकेबाज शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ९२ बॉलमध्ये १०० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. (IND vs AUS)

संबंधित बातम्या

केएल राहुलचे दमदार अर्धशतक

शुभमन गिल आणि श्रेयस अय्‍यर तंबूत परतल्‍यानंतर कर्णधार  केएल राहुल याने इशान किशनबराेबर धावफलक हालता ठेवला. त्‍याने ३५ चेंडू मध्येआपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावले.

सूर्यकुमारचा धमाका

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात सुर्यकुमारने शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने आपल्या खेळीत ३७ बॉलमध्ये ७२ धावांची खेळी केली. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावले. भारतीय फलंदाजांच्या धमाकेदार खेळीमुळे संघाने ऑस्ट्रेलियापुढे धावांचा डोंगर उभारला आहे.

nbsp;

हेही वाचा : 

Back to top button