England vs South Africa दक्षिण आफ्रिकेने इंग्लडवर १० धावांनी मिळवला विजय | पुढारी

England vs South Africa दक्षिण आफ्रिकेने इंग्लडवर १० धावांनी मिळवला विजय

शारजाह : पुढारी ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकेने दिलेले १९० धावांच्या आव्हानाचा इंग्लंडने ( England vs South Africa ) मोठ्या धीराने सामना केला. पण  आफ्रिकेच्या गोलंदाजीवर तसेच रबाडाने अखेरच्या षटकात घेतलेल्या हॅटट्रीकमुळे इंग्लंड १७९ धावा करुन शकला. यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना १० धावांनी जिंकला.

हा सामना जरी आफ्रिकेने ( England vs South Africa ) जिंकला असला तरी त्यांचा या वर्ल्डकप मधील प्रवास इथेच थांबला आहे. साखळी सामन्यातील आफ्रिकेचा हा ५ वा आणि शेवटचा सामना होता. तसेच सेमीफायनल मध्ये पोहचण्यासाठी इंग्लंडला १३० धावांमध्ये पराभूत करावे लागणार होते. परंतु, इंग्लंडने १७९ धावा बनवल्या व आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये पोहचता आले नाही. इंग्लंडने हा सामना हरला असला तरी त्यांनी आधीच ८ गुण व चांगल्या रनरेटमुळे ते सेमीफायनलमध्ये पोहचले आहेत. ग्रुप A मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहचले आहेत.

आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने चांगली सुरुवात केली. चौथ्या षटकापर्यंत सलामीवीर जेसन रॉय आणि जॉस बटलर यांनी ३७ धावा फलकावर लावल्या. पण, पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धाव घेताना रॉय हा जायबंदी झाला त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. रॉयने १५ चेंडूत २० धावा केल्या. त्यानंतर मोईन अली मैदानात उतरला. यानंतर सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बटलर झेल बाद झाला. बटलरने १५ चेंडूत २६ धावा केल्या. यानंतर आलेल्या जॉन बियोस्टो फार काही करु शकला नाही तो अवघ्या १ धावेवर शम्सीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. मोईन अली आणि डेव्हिड मलान यांनी डावाला सावरले तसेच मोठे फटके मारण्यास प्रारंभ केला.

बाराव्या षटकात इंग्लंडने शंभरी पार केली. तेराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोईन अलीने शम्सीला षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका मारायला जाऊन तो झेल बाद झाला. मोईन अलीने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. मलानची साथ देण्यासाठी लिवींगस्टोन मैदानात उतरला. सोळाव्या षटकात लिवींगस्टोनने रबाडाला सलग तीन षटकार ठोकले. चांगली फटकेबाजी करणारा मलान सतराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्रिस्टोरिसच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. मलानने २६ चेंडूत ३३ धावा केल्या.

पुढे लिवींगस्टोन आणि कर्णधार ईयॉन मॉर्गन यांनी धावफलक पुढे नेण्यास प्रारंभ केला. १७ व्या षटकात इंग्लंडने १५० धावांच्या पुढे मजल मारली. १७ षटकाअखेर इंग्लंडने ४ बाद १५५ धावा केल्या होत्या आणि जिंकण्यासाठी १८ चेंडूत ३५ धावांची आवश्यकता होती. अठरा षटकानंतर उर्वरीत २ षटकात इंग्लडला २५ धावांची आवश्यकता होती. १९ षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारायला जाऊन लिवींगस्टोन झेल बाद झाला. त्याने १७ चेंडूत २३ धावा केल्या. ख्रिस वोक्स मैदानात उतरला.

१९ षटकाअखेर इंग्लंडने ५ बाद १७६ धावा बनवल्या. शेवटच्या षटकात इंग्लंडला १४ धावांची आवश्यकता होती. पण, गोलंदाज रबाडा याने पहिल्या तीन चेंडूत ख्रिस वोक्स, कर्णधार ईयॉन मॉर्गन आणि जॉर्डन यांना बाद करत हॅटट्रीक घेतली. या विश्वषकात रबाडा हॅटट्रीक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. या हॅटट्रीकमुळे इंग्लंडला पुढील धावसंख्या करणे कठीण झाले आणि त्यांनी २० षटकात ८ बाद १७८ धावा केल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने हा सामना १० धावांनी जिंकला.

तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला ( England vs South Africa ) प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले.  दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हॅन्ड्रीक लवकर बाद झाल्यावर सलामीवीर डी कॉक आणि रॅस्सी वॅनदर ड्युस्सेन ( England vs South Africa ) यांनी खेळ सांभाळला. दोघांनी चांगली फटकेबाजी सुरु ठेवली. बाराव्या षटकामध्ये डी कॉक झेल बाद झाला. त्याला गोलंदाज आदील रशिद याने बाद केले. डी कॉक याने २७ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रॅस्सी वॅनदर ड्युस्सेन याने आपली फटकेबाजी चालूच ठेवली. त्याला साथ देण्यासाठी मार्करम मैदानात उतराला, दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला.

दरम्यान तेराव्या षटकात रॅस्सी वॅनदर ड्युस्सेन ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर मार्करमच्या साथीने त्याने इंग्लंडवर हल्ला चढवला. तेराव्या षटकात आफ्रिकेच्या संघाने ( England vs South Africa ) शंभरी पार केली. यानंतर दोन्ही फलंदाजांनी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक गोलंदाजाचा चेंडू सीमापार कसा जाईल हाच प्रयत्न दोन्ही फलंदाज करत होते.

दक्षिण आफ्रिकेने १७ व्या षटकात १५० धावा बनवल्या आणि उर्वरीत ३ षटकात रॅस्सी वॅनदर ड्युस्सेन आणि मार्करम त्यांनी संघाला १८९ धावांवर पोहचवले. दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिले. रॅस्सी वॅनदर ड्युस्सेन आणि मार्करम यांनी १०३ धावांची नाबाद भागिदारी रचली.  रॅस्सी वॅनदर ड्युस्सेन याने अवघ्या ६० चेंडूत ९४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ५ चौकार तर ६ षटकार लगावले. तर मार्करम याने २५ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनी इंग्लंडच्या संघासमोर विशाल धावसंख्या उभी केली.

Back to top button