Australia vs West Indies ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून वेस्ट इंडिजचा केला पराभव | पुढारी

Australia vs West Indies ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून वेस्ट इंडिजचा केला पराभव

अबुधाबी : पुढारी ऑनलाईन

टी२० वर्ल्ड कप मध्ये आज (दि. ५) ग्रुप A मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला ( Australia vs West Indies ) आठ गडी राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजने ऑस्टेलियाला १५८ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान २ फलंदाज गमावून १७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर प्राप्त केले.

विडिंजने एक चांगले आव्हान ऑस्ट्रेलियाला ( Australia vs West Indies ) दिले होते. पण, त्याचा बचाव त्यांना करता आला नाही. त्यांची संपूर्ण देहबोली आपण शेवटचा सामना खेळत आहोत आणि ही एक औपचारिकता पूर्ण करायची आहे अशीच होती. कोठेही विंडिज आव्हानाचा बचाव करण्यासाठी लढत आहे असे दिसत नव्हते. उलटपक्षी ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर सुरुवाती पासून दबाव राखला. फॉर्म मध्ये नसलेला सलामीवीर डेव्हीड वार्नर याने अत्यंत महत्त्वाची खेळी केली. अर्धशतक बनवत आपण एैन मोक्याच्या क्षणी फॉर्ममध्ये येत असल्याचे या खेळीतून दाखवून दिले.

ऑस्ट्रेलिया ( Australia vs West Indies )  कडून सलामीवीर डेव्हीड वॉर्नर याने ५६ चेंडूत ८९ धावा करत नाबाद राहिला. या खेळती त्याने ९ चौकार ४ षटकारांची आतषबाजी केली. त्याचा सोबतचा सलामीवीर कर्णधार एरॉन फिंच फार धावा करु शकला नाही. हुसेन याने त्याला त्रिफळाचित केले. फिंच याने ११ चेंडूत ९ धावा केल्या. फिंच नंतर मिशेल मार्श मैदानात उतरला मार्श याने वॉर्नरला उत्तम साथ दिली. दोघांनी विंडीजच्या गोलंदाजीवर दबदबा राखला. अगदी शेवटी ऑस्ट्रेलियाने विंडीजच्या बरोबर स्कोर केल्यावर मिशेल मार्च ख्रिस गेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर वॉर्नरने चौकार मारुन विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मार्श याने ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले.

विंडीजची ( Australia vs West Indies ) गोलंदाजी या सामन्यात अत्यंत सुमार दर्जाची राहिली. ऑस्ट्रेलियाची धाव संख्या ३३ असताना त्यांनी फिंच याला बाद केले. पण त्यानंतर इतर फलंदाजां समोर ते निष्प्रभ ठरले. वेस्ट इंडिज कडून हुसने याने १ बळी घेतला तर गेल याला मार्शच्या रुपात १ बळी मिळाला.

ऑस्ट्रेलियाने हा सामना चांगल्या धावगतीने जिंकला आहे. त्यांचे ८ गुण झाले आहेत. तर रनरेट प्लस १.२१६ इतका आहे. ऑस्ट्रेलिया आता सेमीफायनलमध्ये जवळ जवळ पोहचली आहे. आता दक्षिण आफ्रिका इंग्लड विरुद्ध काय करते हे पहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लड विरुद्धचा सामना जिंकला तर त्यांचे देखिल ८ गुण होतील. पण आफ्रिकेला रनरेटकडे लक्ष दयावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुढे रनरेट घेऊन जाण्यासाठी आफ्रिकेला ६० धावांनी इंग्लंडवर विजय नोंदवावा लागेल. म्हणजे आफ्रिकेने १६० धावा केल्या तर त्यांना इंग्लंडला ९९ धावांवर रोखावे लागेल तर आफ्रिका सेमीफायनल मध्ये पोहचू शकेल.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. विंडीजच्या फलंदाजांनी सुरुवात चांगली केली. सलामीवीर गेल आणि लेवीस यांनी चांगले फटके खेळले. ३० धावांची भागिदारी झाल्यानंतर कमिन्सने गेलला बाद केले. यानंतर ठराविक अंतरावर वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत राहिले. त्यामुळे काही ऑस्ट्रेलियाने विंडिजच्या फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले होते. हेटमायर आणि पोलार्ड यांनी काही काळ संघाला सावरायचा प्रयत्न केला. हेटमायर याने २८ चेंडूत २७ तर पोलार्ड याने ३१ चेंडूत ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटी ब्रावो आणि रसेल यांनी काही मोठे फटके मारत विंडीजच्या संघास १५७ पर्यंत पोहचवले.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना साजेशी गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया कडून हेझलवूड याने चार बळी घेतले. तर स्टार्क, कमिन्स आणि झाम्पा यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. विडींजने हा सामना गमावून स्वत:चे मोठे नुकसान करुन घेतले आहे. या पराभवामुळे ते वर्ल्ड टी२० रँकिंगमध्ये ९ व्या स्थानी ढकलेले गेले आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकप साठी त्यांना पात्रता फेरी मध्ये पुन्हा एकदा सिद्ध करण्याची नामुष्की ओढवली आहे.

Back to top button