India vs Pakistan : आजही पावसाचा ‘खेळ’ झाल्यास सामन्याचा निकाल काय लागणार? | पुढारी

India vs Pakistan : आजही पावसाचा 'खेळ' झाल्यास सामन्याचा निकाल काय लागणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ फेरीतील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रविवारी पूर्ण अपूर्ण राहिला. २४ षटकांचा खेळ झाल्‍यानंतर पावसामुळे सामन्‍यात व्‍यत्‍यय आला.  आता आज (दि.११) राखीव दिवशी दुपारी ३ वाजता खेळ जेथे थांबला तेथून पुढे सुरू होणार आहे. मात्र आजही सकाळपासून  कोलंबो शहरात रिमझिम पाऊस सुरू आहे.

नियम काय आहे?

रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकावली. दोघांनी १२१ धावांची सलामी दिली. भारताच्या डावाचे २५ वे षटक सुरू असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे खेळ थांबवण्यात आला. या वेळी  विराट कोहली ८ तर राहुल १७ धावांवर खेळत होते. भारताच्या २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा झाल्या होत्या. भारत-पाकिस्तान सामना आजपासून सुरू झाला, तर नियमानुसार, रविवारी जिथे थांबला होता त्याच ठिकाणाहून सामना सुरू होईल. म्हणजेच भारताचा डाव २४.१ षटकांपासून सुरू होईल आणि पूर्ण ५० षटकांचा सामना खेळला जाईल. त्यानंतर पाकिस्तानही पूर्ण ५० षटके खेळेल.

सामना रद्द झाल्यास सामन्याचा निकाल काय?

सुपर फोर फेरीत सामना जिंकणाऱ्या संघाला दोन गुण मिळतात. पावसामुळे सामना अनिर्णित राहिल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. पाकिस्तान संघाने सुपर फोरमधील एक सामना यापूर्वीच जिंकला आहे. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात त्याने बांगलादेशचा पराभव केला. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी एक गुण होतील. पाकिस्तानचे तीन गुण होतील. तर सुपर फाेरमध्‍ये पहिलाच सामना खेळणार्‍या टीम इंडियाच्‍या नावावर १ गूण हाेईल.

आजचा सामना जिंकल्‍यास भारताच्‍या नावावर दोन गुण होतील. टीम इंडियाला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १४ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. त्यामुळे आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास टीम इंडियाला एक गुण मिळेल. अशा परिस्थितीत भारताचा मार्ग खडतर  होईल. या स्थितीत पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील, कारण श्रीलंकेने यापूर्वीच एक सामना जिंकला आहे. जर आजचा सामना हरला तर पुढील दोन सुपर फोर सामने टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असतील. पाकिस्तान एका सामन्यात दोन गुण आणि +१.०५१ नेट रन रेटसह सुपर फोरच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर दोन गुण आणि +०.४२० रन रेटसह श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. भारत तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे.

भारत-पाकिस्तान वनडे सामना पहिल्यांदाच राखीव दिवशी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे सामना दोन दिवस चालण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या दिवशी गेलेला पाकिस्तानचा शेवटचा सामना ३१ वर्षांपूर्वी झाला होता. ऑगस्ट १९९२ मध्ये, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळलेला एकदिवसीय सामना दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला होता. त्याचवेळी चार वर्षांपूर्वी भारतासोबत हे घडले होते. जुलै २०१९ मध्ये भारत आणि न्यूझीलंड २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमने-सामने आले हाेते. पावसामुळे सामना राखीव दिवशी गेला. तो सामना न्यूझीलंडने जिंकला होता.

हेही वाचा : 

 

Back to top button