Neymar Record : नेमारचा ब्राझीलसाठी मोठा पराक्रम! मोडला पेले यांचा ‘हा’ विक्रम | पुढारी

Neymar Record : नेमारचा ब्राझीलसाठी मोठा पराक्रम! मोडला पेले यांचा ‘हा’ विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neymar Record : दक्षिण अमेरिका 2026 विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात ब्राझीलने बोलिव्हियाचा धुव्वा उडवत 5 विरुद्ध 1 गोल अशा फरकाने मोठा विजय मिळवला. या सामन्यात स्टार फुटबॉलपटू नेमारने ब्राझीलसाठी चमकदार कामगिरी केली. त्याने सामन्यात दोन गोल नोंदवले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याचबरोबर त्याने दिवंगत महान फुटबॉलपटू पेले यांचा मोठा विक्रम मोडीत काढला. नेमारने आता ब्राझीलचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. पेले यांनी 1957 ते 1971 दरम्यान ब्राझीलसाठी 92 सामने खेळले आणि एकूण 77 गोल केले आहेत.

नेमारची कमाल (Neymar Record)

सध्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरी सुरू आहे. यात ब्राझीलच्या संघाची बोलिव्हियाशी लढत झाली. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना असणा-या नेमारने ब्राझील संघाचे नेतृत्व केले. त्याने या सामन्यात आपल्या राष्ट्रीय संघासाठी चौथा आणि पाचवा गोल केला. यासह त्याच्या खात्यात 79 गोल जमा झाले असून तो ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. यासह नेमारने महान फुटबॉलपटू पेले यांना मागे टाकले आहे. पेले यांनी ब्राझीलसाठी 77 गोल केले होते. त्यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.

अॅमेझॉन शहराच्या बेलेम येथे झालेल्या बोलिव्हियाविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात ब्राझीलसाठी 31 वर्षीय नेमारची 17 व्या मिनिटाला पेनल्टीही हुकली. पण त्यानंतर त्याने चमकदार कामगिरी केली. नेमार (61वे, 90+3वे मिनिट), रॉड्रिगो (24वे, 53वे मिनिट) आणि राफिनहा (47वे) यांनी गोल केले. बोलिव्हियासाठी एकमेव गोल व्हिक्टर अब्रेगोने (78व्या मिनिटाला) केला.

रोनाल्डोच्या नावावर सर्वाधिक गोल (Neymar Record)

आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम पोर्तुगीज स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याने 201 सामन्यात 123 गोल केले आहेत. इराणचा अली दाई दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 109 गोल केले आहेत. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी 104 गोलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, नेमारने ब्राझीलसाठी 125 सामन्यांमध्ये 79 गोल केले आहेत आणि फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो 10 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

मी खूप आनंदी : नेमार

सामना संपल्यानंतर नेमारने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत. या विक्रमापर्यंत पोहोचू शकेन असे मला कधीच वाटले नव्हते. पण या विक्रमाचा अर्थ असा नाही की मी पेले किंवा राष्ट्रीय संघातील कोणत्याही खेळाडूपेक्षा सरस आहे.’

Back to top button