IND vs PAK Asia Cup : पाऊस जिंकला..!; भारत पाक हाय व्होल्टेज सामना वॉश आऊट | पुढारी

IND vs PAK Asia Cup : पाऊस जिंकला..!; भारत पाक हाय व्होल्टेज सामना वॉश आऊट

पाल्लेक्केले; वृत्तसंस्था : आशिया चषक 2023 स्पर्धेचा हाय व्होल्टेज ड्रामा अखेर पावसात विझून गेला. कँडीच्या पाल्लेकेले येथील स्टेडियमवर झालेला हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. श्रीलंकेच्या हवामान खात्याने येथे शनिवारी 90 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. तो अंदाज खरा ठरला. या पावसाने पहिल्यापासूनच खेळात व्यत्यय आणला. दोनवेळा थांबूनही भारताचा डाव कसाबसा पुरा झाला. भारताने पाकिस्तानला 267 धावांचे आव्हान दिले होते; परंतु पाकिस्तानने फलंदाजी करावी हे बहुतेक वरुणराजाला मान्य नव्हते. भारताचा डाव संपल्यानंतर सतत पडत असलेल्या पावसामुळे सामनाधिकारी आणि पंचांनी रात्री दहा वाजता सामना रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केेले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. भारताचा पुढील सामना आता सोमवारी नेपाळशी होईल. (IND vs PAK Asia Cup)

तत्पूर्वी, पाकच्या वेगवान मार्‍यापुढे टीम इंडियाच्या आघाडी फळीने हाराकिरी केल्यानंतर इशान किशन (82) आणि हार्दिक पंड्या (87) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने सर्वबाद 266 धावा केल्या. पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने 4, तर नसीम शाह व हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. (IND vs PAK Asia Cup)

श्रीलंकेतील पाल्लेक्केले येथे झालेल्या आशिया कप 2023 च्या तिसर्‍या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हाय व्होल्टेज सामन्यात सलामी फळीकडून भारताला मोठी अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या तोफेसमोर रोहित-कोहलीचे बुरुज ढासळले. पावसापूर्वी रोहित चांगलाच खेळत होता; पण पाऊस थांबताच हिटमॅनचा डाव आटोपला. रोहितनंतर विराट कोहलीही तंबूत गेला. पहिल्याच षटकात रोहितला जीवदान मिळाले. पण नंतर शाहिन आफ्रिदीने अखेरीस पाचव्या षटकात रोहित शर्माला बाद केले अन् पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने 22 चेंडूंत 11 धावा केल्या. यानंतर शाहिन आफ्रिदीने विराट कोहलीच्या रूपाने भारताला दुसरा मोठा धक्का दिला. विराट कोहलीने 4 धावा केल्या.

यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यरही काही विशेष करू शकला नाही. त्याने येताच आक्रमक खेळ दाखवला. पण त्यानंतर हॅरिस रौफने त्याला फखर झमानच्या हातून झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

या पडझडीनंतर इशान किशन व हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी भागीदारी करून डाव सावरला. के. एल. राहुलच्या जागी मिळालेल्या संधीचे इशानने सोने केले अन् अर्धशतक झळकावून निवड समितीला फेरविचार करण्यास भाग पाडले. आपण राहुलचा पर्याय नसून संघातील आपली जागा फिट्ट आहे, हे त्याने दाखवून दिले. किशनने 54 चेेंडूत अर्धशतक गाठले. वन डे क्रिकेटमध्ये सलग चार सामन्यांत 50+ धावा करणारा तो महेंद्रसिंग धोनीनंतर (2011) भारताचा पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला.

इशान किशननंतर हार्दिक पंड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वन डेतील 11 वे अर्धशतक आहे. त्याने 34व्या षटकात आगा सलमानच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून पन्नाशी गाठली. 37 व्या षटकात भारताचे द्विशतक फलकावर लागले. इशान किशन आणि हार्दिक पंड्या दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. किशन त्याच्या शतकाच्या जवळ पोहोचला असताना हॅरिस रौफने इशानला शॉटबॉलवर बाद केले. बाबरने त्याचा झेल घेतला. इशानने 81 चेेंडूंत 82 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 2 षटकार होते.

44 व्या षटकात भारतावर पुन्हा संकट कोसळले. राऊंड द विकेटचा मारा करीत आलेल्या शाहिन आफ्रिदीने पाकिस्तानसाठी गले की हड्डी बनलेल्या हार्दिक पंड्याला स्लो बॉलवर चकवले. हार्दिकचा सोपा झेल आगा सलमानने घेतला. आफ्रिदीने 90 चेंडूंत 87 धावा करताना 7 चौकार व एक षटकार मारला. याच षटकात रवींद्र जडेजा (14) यालाही आफ्रिदीने बाद केले. यानंतर पुढच्या षटकात शार्दुल ठाकूर (3) आल्या पावली परत गेला. त्यामुळे 300 धावसंख्येची स्वप्ने पाहणार्‍या भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. यावेळी भारताची अवस्था 8 बाद 242 अशी झाली. त्यानंतर भारताचा डाव 266 धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानला याचा पाठलाग करायचा होता, परंतु त्यांचे फलंदाज मैदानात यायच्या आतच पाऊस स्टेडियमवर अवतरला.

हेही वाचा; 

Back to top button