CRICKET WORLD CUP 2023 : वर्ल्डकप उद्घाटन सोहळा 4 ऑक्टोबरला होणार | पुढारी

CRICKET WORLD CUP 2023 : वर्ल्डकप उद्घाटन सोहळा 4 ऑक्टोबरला होणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात होणार्‍या वनडे वर्ल्ड कपला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपची सुरुवात ही इंग्लंड आणि न्यूझीलंड या गतविजेत्या आणि उपविजेत्या संघातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून याच स्टेडियमवर वर्ल्ड कपचा ग्रँड उद्घाटन सोहळा देखील होणार आहे, मात्र हा उद्घाटन सोहळा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी होणार नसून तो आदल्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला संध्याकाळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी आयसीसी कॅप्टन्स डे देखील आहे.

वर्ल्ड कपचे सर्व सराव सामने हे 3 ऑक्टोबरला संपणार आहेत. त्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये दाखल होतील. हा एक ग्रँड उद्घाटन सोहळा असणार आहे यात शंका नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 4 ऑक्टोबरला थिरुवअनंतपुरमवरून अहमदाबादमध्ये सकाळी दाखल होईल. यापूर्वी भारत नेदरलँडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा कशी असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार हा सोहळा देदीप्यमान असणार आहे. बॉलीवूडमधील आघाडीचे गायक आणि ख्यातनाम आंतरराष्ट्रीय स्टार्स ही संध्याकाळ यादगार करण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कपमधील सामने हे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्याच्या आधी उद्घाटन सोहळा आयोजित करणे शक्य होणार नाही. त्यामुळेच उद्घाटन सोहळा हा पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईट शो आणि आतषबाजी सोबतच धमाकेदार नृत्याचे प्रदर्शन देखील होईल.

या उद्घाटन सोहळ्याला चाहत्यांसोबतच आयसीसी आणि बीसीसीआयचे सर्व उच्च अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. बीसीसीआय आणि आयसीसी या उद्घाटन सोहळ्याला जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डांच्या उच्च अधिकार्‍यांना देखील बोलावणार आहे.

Back to top button