World Athletics Championships : भारतीय धावपटूंनी रचला इतिहास! 4×400 मीटरच्या अंतिम फेरीत धडक | पुढारी

World Athletics Championships : भारतीय धावपटूंनी रचला इतिहास! 4x400 मीटरच्या अंतिम फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : World Athletics Championships : हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटूंनी 4×400 मीटर रिले शर्यतीत इतिहास रचला आहे. 2 मिनिट 59.05 सेकंदांची वेळ नोंदवत भारतीय संघ पुरुष पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. या धावपटूंनी राष्ट्रीय आणि आशियाई विक्रमावर आपली मोहोर उमटवली आहे. यापूर्वीचा विक्रम जपानी खेळाडूंच्या नावावर होता (2 मिनिटे 59.51 सेकंद).

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शनिवारी शानदार धाव घेतली. याहिया, जेकब, वरियाथोडी आणि रमेश या भारतीय चौकडीने स्पर्धेत ब्रिटन संघाला मागे टाकले आणि दुसरे स्थान मिळवले. शर्यत सुरू झाली तेव्हा याहिया याने भारतासाठी संथ सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या टप्प्यानंतर भारत सहाव्या क्रमांकावर राहिला. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अमोज जेकबने शानदार पुनरागमन केले आणि भारताला दुसऱ्या स्थानावर पोहचवले. यानंतर मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांनी शेवटच्या दोन टप्प्यात आपला वेग कायम राखत शर्यत पूर्ण केली. याचबरोबर भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपच्या 4×400 मीटर रिले शर्यतीच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. (World Athletics Championships)

अमेरिकेचा संघ अव्वल स्थानी (World Athletics Championships)

भारतीय धावपटूंनी जागतिक विक्रमवीर अमेरिकन संघाला (2 मिनिट 58.47 सेकंद) खडतर आव्हान दिले. तर ग्रेट ब्रिटन (2 मिनिट 59.42 सेकंद) आणि जमैका (2 मिनिट 59.82 सेकंद) या बलाढ्य संघांपेक्षा भारतीय धावपटू पुढे राहिले. ब्रिटनला तिसऱ्या आणि जमैकाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा

Back to top button