Tilak Varma : टीम इंडियातील नंबर 4 चे कोडे सुटले! ‘हा’ फलंदाज बनला दावेदार | पुढारी

Tilak Varma : टीम इंडियातील नंबर 4 चे कोडे सुटले! ‘हा’ फलंदाज बनला दावेदार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tilak Varma : भारतीय संघासाठी वेस्ट इंडिज (IND vs WI) दौरा संमिश्र राहिला. नुकत्याच संपलेल्या या दौऱ्यात भारतीय संघाने (Team India) 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 तर त्यानंतरची 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. पण 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला यजमान कॅरेबियन संघाने 3-2 ने मात देली. टीम इंडियाने 2 वर्षांत पहिल्यांदाच टी-20 मालिका गमावली. पण या पराभूत मालिकेतूनही टीम इंडियाला (Team India) काही महत्त्वाच्या गोष्टी गवसल्या आहेत ज्या भविष्यात उपयुक्त ठरतील.

तिलक वर्मा (Tilak Varma) सारख्या युवा खेळाडूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धमाकेदार पदार्पण हे त्यापैकीच एक. तिलकने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत सिद्ध केले की त्याला भारतीय क्रिकेटचा भावी स्टार का म्हटले जाते. त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून आले. फक्त बॅटनेच नाही तर आता तो चेंडूनेही कमाल करण्याच्या तयारीत आहे. या कामगिरीनंतर तिलक वर्माच्या (Tilak Varma) पदार्पणाने भारताचा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न सुटला असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच त्याला अगामी आशिया कप आणि वनडे विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल का? की त्याला टी-20 साठीच संधी देण्यात येईल? असेही सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

तिलकची बॅट विंडिजमध्ये तळपली

तिलक वर्माच्या संघातील समावेशावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या युवा खेळाडूला पूर्ण पाठिंबा दिला आणि पाचही सामन्यांमध्ये त्याला मैदानात उतरवले. तिलकनेही आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने शानदार फलंदाजी केली. तिलकने पाच सामन्यांमध्ये मिळून 58 च्या सरासरीने 173 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141 होता. 5 पैकी 2 सामन्यात तो नाबाद राहिला. या मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत तिलक अव्वल राहिला.

तिलकची (Tilak Varma) 4 सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी

तिलकने टी-20 मालिकेतील 4 सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. तर एका सामन्यात तो तिस-या क्रमांकावर उतरला होता. अशा प्रकारे त्याने भारतीय व्यवस्थापनाची डोकेदुखी थोडी कमी केली आहे. म्हणजेच आता तिलकला चौथ्या क्रमांकावर अगदी एकदिवसीय सामन्यातही आजमावण्याचा पर्याय संघ व्यवस्थापनाला मिळाला आहे.

अय्यर-राहुलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह

आता टीम इंडियाची पुढची मोठी कसोटी आशिया चषक आणि विश्वचषक आहे. तिलक वर्माने अद्याप वनडे पदार्पण केलेले नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या फिटनेसवर सध्या प्रश्नचिन्ह कायम आहे. अशा परिस्थितीत तिलकची आशिया चषक संघात निवड होऊ शकते. पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत तिलकने ज्या प्रकारचा खेळ दाखवला आहे, त्यामुळे त्याचा टीम इंडियातील स्थानावरचा दावा अधिक बळकट झाला आहे.

तिलक वर्मा अपयशी ठरला तर…

तिलक वर्मा (Tilak Varma) अपयशी ठरला तरी घाबरण्याची गरज नाही, कारण श्रेयस अय्यर आणि केएल राहुल दुखापतीतून बरे होऊन आशिया चषकातून पुनरागमन करणार आहेत. यासोबतच संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यावरही नंबर-4 साठी विचार केला जाऊ शकतो. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनाकडे भरपूर पर्याय आहेत, पण योग्य पर्याय अजूनही सापडलेला नाही.

अय्यरच्या पुनरागमनाकडे नजर

अय्यरने अलीकडच्या काळात चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली आहे, मात्र तो सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपमधून तो पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. श्रेयसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत 20 सामने खेळले आणि 47.35 च्या सरासरीने 805 धावा केल्या. त्याच्या नावावर दोन शतके आणि पाच अर्धशतके आहेत.

Back to top button