Wanindu Hasaranga Retirement : हसरंगाची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला निर्णय | पुढारी

Wanindu Hasaranga Retirement : हसरंगाची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकन ​​संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्याने क्रिकेटच्या दिर्घ फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हसरंगाने यासंदर्भात श्रीलंका क्रिकेटला पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. पत्रात त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची आणि राष्ट्रीय संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याची इच्छा नमूद केली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, ‘हसरंगाला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपले करिअर सुरू ठेवायचे आहे. राष्ट्रीय संघाचे दिर्घकाळासाठी प्रतिनिधित्व करणे ही त्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आम्ही त्याचा निर्णय स्वीकारतो. आम्हाला विश्वास आहे की तो आमच्या वनडे आणि टी-20 क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग असेल,’ असे श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ॲशले डिसिल्वा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हसरंगाने डिसेंबर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तत्पूर्वी, त्याने 2017 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, तो श्रीलंकेच्या संघाकडून केवळ चार कसोटी सामने खेळू शकला. त्याने दोन वर्षांपूर्वी एप्रिल 2021 मध्ये घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याने तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर मंगळवारी (15 ऑगस्ट) रोजी श्रीलंका क्रिकेटला आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली.

अष्टपैलू हसरंगाने आपल्या देशासाठी 48 एकदिवसीय आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 158 विकेट घेतल्या आहेत. तर 1365 धावांचे योगदान दिले आहे. अलीकडेच झिम्बाब्वे येथे 2023 च्या विश्वचषक पात्रता फेरीतही त्याने दमदार कामगिरी केली होती. हसरंगा या स्पर्धेत सर्वाधिक 22 बळी घेणारा गोलंदाज होता. हसरंगाने अनेक परदेशी टी-20 लीगमध्येही चमक दाखवली आहे.

Back to top button