Premier League : २१२ देशांत प्रसारण; ४७० कोटी चाहते, प्रत्येक संघाची कमाई किमान ८०० कोटी!

Premier League : २१२ देशांत प्रसारण; ४७० कोटी चाहते, प्रत्येक संघाची कमाई किमान ८०० कोटी!

लंडन; वृत्तसंस्था : युरोपियन क्लब फुटबॉलचा हंगाम आता दोनच दिवसांत सुरू होतो आहे. युरोपियन लीगमध्ये सर्वप्रथम स्पेनमधील स्पॅनिश ला लिगाचे बिगुल वाजेल आणि त्यानंतर दोन दिवसांनी १२ ऑगस्ट रोजी इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेला धुमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. ही प्रीमियर लीग पुढील १९ मे पर्यंत चालेल. प्रीमियर लीगमध्ये एकूण २० संघ सहभागी होतात आणि प्रत्येकी ३८ सामने खेळतात. यापैकी एक सामना घरच्या मैदानावर तर एक सामना प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर असतो. यंदा प्रीमियर लीगचा हा ३२ वा हंगाम असेल आणि अनेक नवे नियम, हे यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य असणार आहे. (Premier League)

प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक संघ पहिल्या 9 महिन्यांच्या कालावधीत ३८ सामने खेळतील. प्रीमियर लीगला जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखले जाते. चाहत्यांच्या निकषावरदेखील ही स्पर्धा सर्वोच्च स्थानावर राहात आली आहे. प्रीमियर लीग स्पर्धेचे चक्क २१२ देशांमधून थेट प्रसारण केले जाते आणि तब्बल ४७० कोटी चाहते या स्पर्धेचा आनंद लुटतात. (Premier League)

या स्पर्धेत भाग घेणार्‍या प्रत्येक संघाची कमाई किमान 800 कोटींच्या घरातील असते आणि हे देखील या स्पर्धेचे महत्त्वाचे आकर्षण केंद्र ठरत आले आहे. विद्यमान चॅम्पियन मँचेस्टर सिटीला जेतेपदासाठी थोडेथोडके नव्हे तर चक्क १७९० कोटी रुपयांच्या इनामाने गौरवले गेले होते, त्यावरूनदेखील या स्पर्धेचा आवाका स्पष्ट होतो. दुसर्‍या स्थानावरील अर्सेनल संघ देखील १७६५ कोटी रुपये बक्षिसाचा मानकरी ठरला होता. स्पर्धेत २० संघांत शेवटच्या क्रमांकावर साऊथॅम्प्टनचा संघ होता आणि त्यांनादेखील चक्क १३५० कोटी रुपयांचे इनाम मिळाले होते. (Premier League)

१९९२ मध्ये सुरुवात झालेल्या प्रीमियर लीग स्पर्धेत आजवर ५८ क्लब संघांनी सहभाग घेतला असून यातील ४९ संघ इंग्लंडमधील तर २ संघ वेल्समधील राहिले आहेत. आश्चर्य म्हणजे आजवर यातील फक्त ७ संघच जेतेपद पटकावू शकले आहेत. आजवरच्या सर्वात यशस्वी संघात मँचेस्टर युनायटेड आघाडीवर असून त्यांनी १३ वेळा जेतेपदावर आपली मोहर उमटवली आहे. याशिवाय, मँचेस्टर सिटीने ७, चेल्सीने ५, अर्सेनलने ३, तसेच ब्लॅकबर्न रोव्हर्स, लिस्टर सिटी, लिव्हरपूल, यांनी प्रत्येकी एक वेळा यश संपादन केले आहे. मँचेस्टर सिटी व मँचेस्टर युनायटेड या दोनच संघांना सलग तीन किंवा त्याहून अधिक जेतेपद मिळवता आले आहे. अर्सेनल, चेल्सी, इव्हर्टन, लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, टॉटनहम हे संघ स्पर्धेतून एकदाही रेलेगेट झालेले नाहीत.

सर्वाधिक पाहिले जाणारे खेळ

स्पर्धा               खेळ                       प्रेक्षक
ईपीएल          फुटबॉल                    ४७० कोटी
एनएफएल     अमेरिकन फुटबॉल      ४५० कोटी
ला लिगा        फुटबॉल                     २७० कोटी
एमएलबी       बेसबॉल                     २१० कोटी
एनबीए          बास्केटबॉल                १५० कोटी

असे असतील यंदाचे नवे नियम :

ऑफसाईडचा नियम : यंदा सर्वात महत्त्वाचा बदल ऑफसाईड नियमात होणार आहे. नवा नियम असे सांगतो की, जो खेळाडू ऑफसाईड असेल, तो प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडूचा ताबा घेऊन पुढे येत असताना ऑनसाईड असू नये.

यलो, रेड कार्ड : चेंडूवर ताबा घेण्यासाठी जाणूनबुजून टॅकल केले नाही, असे रेफ्रींना वाटत असेल तर अशा वेळी त्या खेळाडूला कोणतेही कार्ड लागू केले जाणार नाही.

गोलरक्षकाबाबत दंडक : शूटआऊटवेळी काही गोलरक्षक स्ट्रायकरचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करतात. यापुढे असा प्रयत्न झाल्यास गोलरक्षकावर कारवाई केली जाणार आहे.

वेळेबाबत दंडक : बर्‍याचदा गोलरक्षक चेंडू शक्य तितका वेळ आपल्याच ताब्यात ठेवून वेळ वाया घालवतात. यापुढे असा प्रयत्न निदर्शनास आल्यानंतर रेफ्री सर्वप्रथम ताकद देतील आणि तरीही सुधारणा झाली नाही तर अशा गोलरक्षकावर कारवाई केली जाईल.

१३८ वर्षांपूर्वीचा लूटन टाऊन संघ प्रथमच लीग खेळणार

यंदा प्रीमियर लीगमधील खेळणार्‍या २० पैकी १७ संघ जुनेच आहेत. या १७ संघांनी मागील प्रीमियर लीग देखील खेळली होती. यंदा बर्नले, शेफिल्ड युनायटेड आणि लूटन टाऊन असे तीन नवे संघ इतिहासात प्रथमच प्रीमियर लीग स्पर्धेत सहभागी होत आहेत. हे तिन्ही संघ अनुक्रमे लिस्टर, लीडस् आणि साऊथॅम्प्टन यांची जागा घेतील. यापैकी लूटन टाऊन हा संघ १३८ वर्षांपूर्वीचा आहे. या संघाच्या कामगिरीकडे यंदा विशेष लक्ष असणार आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news