सूर्यकुमारने केली रोहितची बरोबरी, आता ‘विराट’ विक्रम मोडण्‍यापासून केवळ तीन पावले दूर… | पुढारी

सूर्यकुमारने केली रोहितची बरोबरी, आता 'विराट' विक्रम मोडण्‍यापासून केवळ तीन पावले दूर...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेस्‍ट इंडिज विरुद्‍च्‍या टी-20 मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात टीम इंडियाने बाजी मारली. या विजयामुळे या मालिकेत भारताचे आव्‍हान जिवंत राहिले आहे. मंगळवारी झालेल्‍या सामन्‍यात सूर्यकुमारच्‍या झंझावती फलंदाजीने भारताचा विजय सोपा झाला. त्‍याने ४४ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांच्‍या मदतीने ८३ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे त्‍याने रोहित शर्माच्‍या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. तर विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्‍यासाठी केवळ तो तीन पावले दूर आहे. ( Suryakumar T-20 )

वेस्‍ट इंडिज विरुद्‍धच्‍या तिसर्‍या टी-२० सामन्‍यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ५ गडी गमावत १५९ धााव केल्‍या. प्रत्युत्तरादाखल भारताने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर १७.५ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. सूर्यकुमार याने ४४ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली. त्याचवेळी तिलक वर्माने ३७ चेंडूंमध्‍ये चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. सूर्यकुमारला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

Suryakumar T-20 : सूर्यकुमारने केली रोहित शर्माची बरोबरी

मंगळवारी सूर्यकुमारचा हा ५१वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत ३ शतके आणि १४ अर्धशतके फटकावली आहेत. मंगळवारी आपल्‍या अप्रतिम खेळीने त्‍याने सामनावीराचा पुरस्‍कार पटकावला. अशी कामगिरी करणारा तो T20 मधील बारावा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहितने आतापर्यंत १४८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२ वेळा सामनावीराचा पुरस्‍कार फटकावला आहे. विशेष म्‍हणजे सूर्यकुमारनेसुमारे तीनपट कमी सामने खेळून रोहितची बरोबरी केली आहे.

विराटचा विक्रम मोडण्‍यापासून केवळ तीन पावले दूर…

टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यांमध्‍ये सर्वाधिकवेळा सामनावीर बहुमान मिळविण्‍याचा विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्‍या नावावर आहे. त्‍याने ११५ सामन्‍यांत १५ वेळाह हा पुरस्‍कार पटकावला आहे. तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०९ सामन्यांत १४ वेळा सामनावीरांचा पुरस्‍कार पटकावला आहे.

सूर्यकुमार विराटच्या विक्रमापासून फक्त तीन पावले दूर आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारने या सर्वांपेक्षा कमी सामने खेळले आहेत. त्याने १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्‍ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने या फॉरमॅटमध्ये १२ वेळा प्लेअर ऑफ द मॅच (सामनावीर) पुरस्कार जिंकले आहेत. पदार्पणापासूनच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्‍याचा विक्रम सूर्यकुमारच्‍या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय T20 सामन्‍यांमध्‍ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार कंसात सामने आणि पुरस्‍कार

विराट कोहली (११५ -१५)
मोहम्मद नबी (१०९-१४)
सूर्यकुमार यादव ( ५१-१२ )
रोहित शर्मा (१४८-१२)

हेही वाचा :

 

Back to top button