Team India : आशिया कप, वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे ‘हे’ 18 खेळाडू निश्चित? | पुढारी

Team India : आशिया कप, वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे ‘हे’ 18 खेळाडू निश्चित?

पुढारी ऑनलाईन डेस्क : वनडे वर्ल्डकपसाठी (ODI World Cup) टीम इंडियाची (Team India) लवकरच घोषणा केली जाणार आहे. मात्र विश्वचषकासाठी भारतीय संघ कसा असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंतिम 15 खेळाडू कोण असतील हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. दरम्यान, वनडे असो की टी-20 गेल्या दोन महिन्यांपासून खेळत असलेल्या खेळाडूंमधूनच संघ निवडला जाणार हे निश्चित आहे. मात्र, सध्या दुखापतीमुळे बाहेर असलेल्या तीन ते चार खेळाडूंचा फिटनेस पाहून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, आता 19 खेळाडूंची यादी समोर आली आहे जे विश्वचषकाच्या संभाव्य खेळाडूंपैकी आहेत आणि त्यापैकी 15 खेळाडूंची निवड केली जाईल असे मानले जात आहे. खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे यावरून स्पष्ट झाले आहे.

6 टी-20 सामने खेळणे बाकी

आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा (Team India) एकही एकदिवसीय सामना शिल्लक नाहीत. पण 6 टी-20 सामने खेळणे बाकी आहे. यातील तीन सामने वेस्ट इंडिज आणि तेवढेच सामने आयर्लंडविरुद्ध खेळले जाणार आहेत. पीटीआयच्या अहवालानुसार, भारतीय संघ 18 खेळाडूंसह पुढे जाईल, त्यापैकी बहुतेकांची आशिया कपसाठी निवड केली जाईल आणि सर्व 18 खेळाडूंसह भारतीय संघ 2023 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळताना दिसेल. दरम्यान, आयसीसीने 28 सप्टेंबरपर्यंत संघ जाहीर करण्यास सांगितल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यापर्यंत भारतीय संघाच्या अंतिम पंधरा जणांची घोषणा केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांना मिळणार संधी?

भारतीय संघात (Team India) 3 सलामीवीर, 3 मधल्या फळीतील फलंदाज, 3 यष्टिरक्षक, दोन वेगवान अष्टपैलू, चार वेगवान गोलंदाज, 3 फिरकीपटूंचा समावेश आहे. सलामीवीरांमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आहेत तर मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केएल राहुल, इशान किशन आणि संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल आहेत. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज आहेत, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार आहेत.

दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारताचा संघ कसा असेल?

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, इशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.

आशिया चषक 2023 मध्ये भारताला किमान 5 सामने खेळायला मिळतील. जर संघाने अंतिम फेरी गाठली तर सामन्यांची संख्या 6 पर्यंत जाईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका आणि त्यानंतर थेट विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध आहे, तर विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे.

Back to top button