Hardik Pandya : हार्दिक पंड्या मोडणार बुमराहचा ‘हा’ मोठा विक्रम! | पुढारी

Hardik Pandya : हार्दिक पंड्या मोडणार बुमराहचा ‘हा’ मोठा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजच्या 149 धावांना प्रत्युत्तर देताना युवा भारतीय संघ केवळ 145 धावाच करू शकला. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील संघ पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून संघाची तयारी करत आहे. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासारखे (Rohit Sharma) स्टार खेळाडू टी-20 सामने खेळताना फार कमी दिसत आहेत. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. या सामन्यात पंड्याच्या निशाण्यावर एक मोठा विक्रमही असणार आहे.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू पंड्या (Hardik Pandya) पाठीच्या दुखापतीमुळे 2020 मध्ये गोलंदाजीपासून दूर राहिला. त्याने 2022 मध्ये गोलंदाजी सुरू केली. आयपीएल 2022 नंतर तो अष्टपैलू म्हणून संघात सामील झाला आणि 2022 च्या विश्वचषक स्पर्धेनंतच्या न्यूझीलंड दौ-यापासून तो टी-20 संघाचा कर्णधार बनला.

पंड्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून 77 सामन्यांत 70 विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो बुमराहसह संयुक्त पाचवा गोलंदाज आहे. युजवेंद्र चहल 76 सामन्यांत 93 बळी घेऊन पहिल्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमारच्या नावावर 87 सामन्यात 90 बळी आहेत.

अश्विनच्या नावावर 65 सामन्यात 72 विकेट आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पंड्याने तीन विकेट घेतल्यास तो बुमराह आणि अश्विनला मागे टाकून भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनेल. विंडिजविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 मध्ये तो हा पल्ला गाठू शकला नव्हता. पण त्याच्याकडे अजून चार टी-20 सामने खेण्याची संधी आहे. त्यामुळे येणा-या काळात तो नक्कीच बुमराहला मागे टाकले असा विश्वास चाहत्यांना आहे.

Back to top button